शनिवारी दुपारीच बहुतांश लसीकरण केंद्रांवर लस संपली होती, त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये येथे लसीकरण दुपारीच थांबले. महापालिका क्षेत्रात रांगेतील अनेकांना लस मिळू शकली नाही. काही ठिकाणी किरकोळ वादही झाले. लस न घेताच परतावे लागले होते. रविवारीदेखील अशीच स्थिती राहिली. काही खासगी रुग्णालयांत मोजके डोस शिल्लक होते. सर्व म्हणजे २७२ केंद्रांवर लसीकरण झाले नाही.
रविवारी दुपारी बाराच्या सुमारास पुण्याहून ३१ हजार डोस जिल्हा परिषदेत आले. त्यानंतर आरोग्य यंत्रणेने तातडीने हालचाली करत केंद्रांना लस वितरीत केली. महापालिका क्षेत्रातील सर्व केंद्रांना पोहोचली, पण ग्रामीण भागात मिळू शकली नाही. संध्याकाळपर्यंत पोहोचल्यानंतर सोमवारी सर्वत्र लसीकरण सुरू होईल, असे आरोग्य विभागातून सांगण्यात आले.
चौकट
रविवारचे लसीकरण असे
- ग्रामीण भागात - ३३४
- निमशहरी भागात - ९७
- महापालिका क्षेत्रात - ८२२
- खासगी रुग्णालयांत - ८४
- दिवसभरात एकूण - १३३७
- आजवरचे लसीकरण - ३,९७,९४४