सांगली : महापालिका क्षेत्रात बुधवारी एकाच दिवशी ५० हजार नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभागासाठी अडीच हजार लसी उपलब्ध करून दिल्या जाणार असून, लसीकरणासाठी पाच बाह्य केंद्र सुरू केले जाणार असल्याची माहिती महापौर दिग्विजय सूर्यवंशी व आयुक्त नितीन कापडणीस यांनी सोमवारी दिली.
कापडणीस म्हणाले की, महापालिका क्षेत्रात १६ जानेवारीपासून लसीकरण अभियान सुरू आहे. २० प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाची सोय केली आहे. आतापर्यंत २ लाख ३९ हजार ६५६ नागरिकांना पहिला, तर १ लाख ३ हजार ८८० नागरिकांचा दुसरा डोस देण्यात आला आहे. पहिल्या डोसचे ५८ टक्के व दुसऱ्या डोसचे २५ टक्के नागरिकांचे लसीकरण झालेले आहे.
आता बुधवार, दि. १५ रोजी महाकोविड लसीकरण अभियान हाती घेतले आहे. या अभियानाअंतर्गत प्रत्येक प्रभागात तात्पुरती पाच लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या प्रत्येक केंद्रावर १०० नागरिकांचे मोफत लसीकरण केले जाईल. याशिवाय आरोग्य केंद्रातही लस उपलब्ध असेल. प्रत्येक प्रभागासाठी अडीच हजार असे ५० हजार नागरिकांचे एकाच दिवशी लसीकरण पूर्ण करण्याचा निर्धार आहे. सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. तरी या लसीकरण अभियानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही कापडणीस यांनी केले.