करगणी : सलून व्यावसायिकांचा दररोज शेकडो नागरिकांशी संपर्क येत आहे. त्यामुळे प्राधान्याने सलून व्यावसायिक व त्यांच्या कुटुंबियांना कोविडची लस द्यावी, अशी मागणी आटपाडी तालुका नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष प्रवीण क्षीरसागर यांनी केली आहे.
ते म्हणाले, सलून व्यवसायामुळे त्यांच्या सलूनमध्ये येत असणाऱ्या प्रत्येक नागरिकाशी थेट संपर्कात येत आहेत. कोरोनाचा जास्त धोका नाभिक समाजाला आहे. कोरोना होऊन बरे झालेले नागरिक सलूनमध्ये येऊन केस-दाढी करून जात आहेत. काही ग्राहक कोरोना पॉझिटिव्ह असतानाही केस, दाढी करण्यासाठी येऊन गेले आहेत. त्यामुळे नाभिक समाजातील अनेकांना कोरोना होण्याचा धोका आहे.
सध्या ज्येष्ठ नागरिकांना लस देणे चालू आहे. नाभिक समाज हा थेट सामान्य नागरिकांच्या संपर्कात येत असल्याने त्यांना प्राधान्याने लस देण्याची मागणी समाजातून होत आहे. याबाबत शासनस्तरावर विचार करण्याची मागणी होत आहे.