लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : येथील प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी उत्तम तायाप्पा जाधव यांची, तर उपाध्यक्षपदी राजाराम सावंत यांची शनिवारी निवड झाली. संचालक मंडळाच्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. त्यांनी विरोधी पॅनेलच्या बाजीराव पाटील आणि महादेव हेगडे यांचा १४ विरुद्ध ७ मतांनी पराभव केला.
बँकेचे अध्यक्ष सुनील गुरव यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठीची निवड प्रक्रिया पार पडली.
निवडीनंतर जाधव म्हणाले की, कोरोना संकटामुळे शिक्षक बँकेच्या संचालकांना वाढीव काळ मिळाला आहे. बँकेची निवडणूक जवळपास एक वर्षाहून अधिक काळ लांबणीवर पडली आहे. अधिक चांगले काम करण्याची ही संधी असून गेल्या पाच वर्षांमध्ये २२ हून अधिक सभासद हिताचे निर्णय घेतले आहेत. येत्या काळात आणखी चांगले निर्णय घेऊन व्याजाचे दर कमी करण्याचा प्रयत्न राहील. त्यादृष्टीने सभासदांना विश्वासात आणि विचारात घेऊन कामकाज केले जाईल. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत कर्मचारी पॅटर्न कमी करून घेतला. कायम ठेवी परत देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सभासद समाधानी आहेत.
यावेळी नेते विश्वनाथ गायकवाड, किरणराव गायकवाड, किसन पाटील, सयाजी पाटील, शशिकांत भागवत, बाबासाहेब लाड, दयानंद मोरे, सतीश पाटील, माणिक पाटील आदी उपस्थित होते.