शेगाव : कुणीकोनूर (ता. जत) येथे आराेग्याच्या प्रश्नाबाबत नागरिकांनी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या कारभाराविरोधात ग्रामपंचायत कार्यालयासमोर शनिवारी उपोषण केले. दरम्यान, ग्रामसेवक व येळवी उपकेंद्राचे आरोग्य अधिकारी यांनी नागरिकांची भेट घेत तातडीने उपाययोजनास सुरुवात केल्याने आंदाेलन मागे घेण्यात आले.
उपोषणात ज्ञानेश्वर आटपाडकर, रमेश चव्हाण, नवनाथ म्हस्के, रामचंद्र खांडेकर, रखमाजी खरात, मोतीराम चव्हाण, परशुराम राठोड, रामचंद्र खरात, शिवाजी कांबळे, कृष्णा चव्हाण, शिवाजी चव्हाण, समीर शेख आदींनी सहभाग घेतला. ज्ञानेश्वर आटपाडकर, कृष्णा चव्हाण म्हणाले, महिनाभरापासून गावात डेंग्यू व तापाचे रुग्ण आहेत. ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. परंतु यावर कोणतेही उपाय करत नव्हते. तसेच गेली दोन वर्ष पाणीपुरवठा होणाऱ्या पाण्यात टीसीएल पावडरचा वापर नव्हता. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ सुरू हाेता. वेळोवेळी सूचना देऊनही प्रशासन दुर्लक्ष करत होते.
येळवी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी फडतरे यांनी गावात प्रत्यक्ष भेट देऊन उपोषणकर्त्यांची समजूत काढली. तात्काळ आरोग्य विभागाचे कर्मचारी बोलावून घरोघरी आरोग्य तपासणी करून रुग्णांवर तत्काळ उपचार सुरू केले. ग्रामपंचायत प्रशासनाने गावात औषध फवारणी सुरू केली. शिवाय पाणीपुरवठा करताना टीसीएल पावडरचा वापर सुरू करत असल्याचे सांगितले. त्यामुळे नागरिकांनी उपोषण मागे घेतले.