लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : येथील प्रहार संघटनेच्या वतीने १९ फेब्रुवारी २०२० रोजी मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. या रुग्णवाहिकेची धुरा श्रीराम ऊर्फ बंटी नांगरे-पाटील यांनी हातात घेतली. दरम्यान, कोरोनाचा कहर सुरू झाला. मात्र संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून नांगरे यांनी रुग्णसेवेमध्ये हयगय केली नाही. त्यांना अक्षय क्षीरसागर व सागर खबाले यांची साथ मिळाली आहे.
घरातून बाहेर पडणे मुश्कील होते, अशा परिस्थितीत नांगरे यांनी खंड न पडू देता रुग्णवाहिकेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर रुग्णसेवा केली. पुणे, मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली, रायगड, सातारा, रत्नागिरी, सोलापूर अशा अनेक जिल्ह्यांमध्ये व कर्नाटक, गोवासारख्या परराज्यांमध्ये रुग्णसेवेचे काम जिवाची पर्वा न करता केले. एवढेच नव्हे तर मृत झालेल्या अनेक कोरोना रुग्णांना अग्नीही दिला आहे. रुग्णांना रुग्णालयात पोहोचवणे, बरा झाला की घरी पोहोचवणे अशी मोफत सेवा त्यांनी केली आहे व करीत आहेत.
त्यांचे जिवलग मित्र अक्षय सुरेश क्षीरसागर व सागर खबाले यांनीही आता रुग्णसेवेचे कार्य प्रहार संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे ठरविले आहे.
अक्षय क्षीरसागर यांनी नुकत्याच घेतलेल्या चारचाकीचे रुग्णवाहिकेमध्ये रूपांतर केले आहे. या रुग्णवाहिकेसाठी लागणारा पेट्रोल खर्च सागर खबाले करणार आहेत.
पस्तिशीच्या आतील टीम
प्रहारच्या या टीममध्ये सर्वजण पस्तिशीच्या आतील तरुण आहेत. यामध्ये जिल्हाप्रमुख स्वप्निल पाटील, दिग्विजय भोसले-पाटील, शिराळा तालुकाप्रमुख श्रीराम नांगरे-पाटील, वाळवा तालुकाप्रमुख संपत कांबळे, ऋषिकेश घोडे-पाटील, ऋषिकेश गायकवाड, दिग्विजय पाटील, धैर्यशील पाटील यांचा यामध्ये समावेश आहे.