लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावणाऱ्या गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) जवानांनाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. त्यात पन्नाशी ओलांडलेल्या होमगार्डना वर्षभरात ड्युटीच मिळालेली नाही. त्यामुळे अनेक होमगार्ड रोजगाराच्या शोधात आहेत. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
सण, उत्सव, निवडणुकीच्या काळात पोलिसांसोबत होमगार्डचे जवानही बंदोबस्तासाठी तैनात केले जातात. या होमगार्डला जितके दिवस काम तितके दिवस पगार दिला जातो. अनेकजण घरची शेती, मजुरी सांभाळत होमगार्डचे कामही करतात. गुन्ह्याच्या तपासाचा भाग वगळता पोलिसांची सर्वच कर्तव्ये होमगार्डकडून पार पाडली जातात. कोरोनाच्या काळात शासनाने ५० वर्षांपुढील कर्मचाऱ्यांना काम देणे बंद केले. यात होमगार्डचाही समावेश होता.
गेल्या वर्षभरापासून पन्नाशी ओलांडलेल्या होमगार्डवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अनेक जवानांना घरीच बसावे लागले आहे. आधीच उदरनिर्वाहासाठी होमगार्डचे काम करणाऱ्या या जवानांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. सध्या हे होमगार्ड मिळेल ते काम करत आहेत.
चौकट
८० टक्के लसीकरण
फ्रंटलाईन वर्कर म्हणून पोलीस, होमगार्डच्या लसीकरणाला पहिल्या टप्प्यात प्राधान्य देण्यात आले. जवळपास ८० टक्के होमगार्डनी पहिला डोस घेतला आहे तर ६० टक्के जवानांनी दुसरा डोस घेतल्याचे प्रशासनाने सांगितले.
चौकट
कोरोनाचा धोका अधिक असल्यामुळे काम बंद
जिल्ह्यातील होमगार्ड नेहमीच पोलिसांच्या बरोबरीने कर्तव्य बजावत असतात. पहिल्या लाटेत कोरोनाचा सर्वाधिक धोका हा पन्नाशी ओलांडलेल्या व्यक्तींना होता. त्यामुळे शासनाने जादा वय असलेल्यांना ड्युटी देऊ नये, असे आदेश दिले. पन्नाशी पार केलेल्या होमगार्डना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठीच हा निर्णय घेतला होता.
- माणिकराव शिंदे, जिल्हा समादेशक
चौकट
जिल्ह्यातील नोंदणीकृत होमगार्ड : १०४५
महिला होमगार्डसची संख्या : ९०
५०पेक्षा जास्त वय असलेले : ५५
सध्या सेवेत असलेले : ८२५
चौकट
आम्ही जगायचे कसे?
होमगार्ड म्हणून कित्येक वर्ष काम करत आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह होमगार्डच्या भत्त्यावर आहे. पण वर्षभरापासून कामच नसल्याने भत्ता बंद झाला आहे. आता किरकोळ कामे करून चरितार्थ सुरू आहे.
- होमगार्ड जवान
चौकट
पन्नास ते साठ रुपये भत्ता असल्यापासून आम्ही होमगार्ड म्हणून काम करत होतो. आता कुठे भत्ता वाढल्याने चांगले दिवस आले होते. पण कोरोनाने तेही हिरावून घेतले. उत्पन्नाचे साधन नसल्याने ओढाताण होत आहे.
- होमगार्ड जवान
चौकट
होमगार्डच्या भत्त्यावर कुटुंब अवलंबून होते. आता वर्षभरापासून तेही बंद आहे. त्यात उत्पन्नाचे साधन नसल्याने शेतमजूर म्हणून काम करत आहे. शासनाने मदतीचा हात द्यावा.
- होमगार्ड जवान