जत : काँग्रेसचे माजी आमदार उमाजी धानाप्पा सनमडीकर (वय ८७) यांचे मंगळवारी सकाळी सहा वाजता सांगलीतील खासगी रुग्णालयात हृदयविकाराने निधन झाले. ते तीनवेळा विधानसभेच्या जत राखीव मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. कैलास, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
गेल्या चार दिवसांपासून सनमडीकर यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे सांगली येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी त्यांचे पार्थिव जत येथे आणण्यात आले. त्यांच्या मुलाच्या कमल आर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये ते दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी मूळ गावी सनमडी (ता. जत) येथे अंत्यविधी करण्यात आले. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
जत तालुक्यातील सनमडी गावातील सामान्य कुटुंबात उमाजी सनमडीकर यांचा जन्म झाला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतले. नंतर १९६२ मध्ये ते सैन्यात दाखल झाले. भारतीय सैन्यदलात शिपाई, हवालदार, नायक या पदांवर त्यांनी काम केले होते. तेथून निवृत्त होऊन गावी आल्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम सुरू केले. सुरुवातीला त्यांना जत पंचायत समिती सदस्यपदाची संधी मिळाली. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीमंत विजयसिंहराजे डफळे यांनी त्यांना १९८५ मध्ये जत राखीव मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली. सामाजिक क्षेत्रातील कामांमुळे ते आमदार पदापर्यंत पोहोचू शकले. १९८५, १९९० आणि १९९९ असे तीनवेळा ते विधानसभेवर निवडून आले.
दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळावर अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. त्यावेळी त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाला होता. जत येथील राजे विजयसिंह डफळे सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान होते. त्याशिवाय सिध्दार्थ शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन करून पाच आश्रमशाळा उभारल्या. त्याद्वारे त्यांनी गोरगरीब मुलांच्या शिक्षणाची सोय केली आहे. आपल्या स्वतःच्या नावे उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाैंडेशनची स्थापना करून पॉलिटेक्निक, इंग्रजी माध्यमाची शाळा, नर्सिंग महाविद्यालय अशा संस्था उभारून तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची त्यांनी सोय केली. शिवाय शेकडो तरुणांच्या हाताला या संस्थांच्या माध्यमातून काम मिळवून दिले.