नरसिंहगाव ते कवठेमहांकाळ रस्त्यालगत रविवारी दुपारी वडाची झाडे पेटविण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : झाडांच्याभोवती आग पेटवून ती तोडण्याची डोकॅलिटी शेतकरी वापरू लागले आहेत. नरसिंहगाव (लांडगेवाडी) ते कवठेमहांकाळ रस्त्यावर रविवारी दुपारी वडाची चार झाडे पेटविण्यात आली होती. वृक्षप्रेमींनी खटपट करून ती विझविली.
झाडे तोडण्यासाठी वन विभागाकडून परवानगीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते. सबळ कारण नसल्यास वन विभाग परवानगी देत नाही. त्यामुळे शेतकरी झाडे पेटवून देतात. काही दिवसांनी ती वठल्यानंतर तोडून टाकतात. रविवारी नरसिंहगाव ते कवठेमहांकाळ रस्त्यालगत चार झाडे पेटविण्यात आली होती. झाडांभोवती पालापाचोळा टाकून आग लावण्यात आली. वारे व उन्हाने आग भडकत गेली. झाडाच्या पारंब्या व बुंध्याने पेट घेतला. परिसरातील रहिवासी व रस्त्यावरील प्रवासी आग पाहूनही दुर्लक्ष करत होते.
काही निसर्गप्रेमींच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी संबंधीत शेतकऱ्यांना फैलावर घेतले. मातीचा मारा करून पालापाचोळा विझविला. झाडावर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे झाडे बचावली. मिरज ते पंढरपूर रस्त्यावरही अनेक ठिकाणी अशाप्रकारे झाडे पेटविण्याचे प्रकार घडतात, असे निसर्गप्रेमींनी सांगितले.