कुंडल : पलूस तालुक्यातील घोगावजवळ अज्ञात चारचाकीच्या धडकेत दोन ऊसतोड मजूर महिला जागीच ठार झाल्या. ही घटना आज, शनिवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत कुंडल पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, घोगावजवळ ऊसतोडणी मजुरांची टोळी राहते. आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास यातील सरस्वती आनंदा घुले (वय ३०) व वनिता शंकर घुले (२३, रा. वाडी शिरढोण, ता. अंबड, जि. जालना) या दोघी प्रातर्विधीसाठी निघाल्या होत्या. यावेळी कऱ्हाडकडून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने या दोघींना धडक दिली. दोघी जागीच ठार झाल्या. धडक दिल्यानंतर वाहनचालकाने वाहनासह पलायन केले. याबाबत शंकर कचरू घुले यांनी कुंडल पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक बापूसाहेब ढेरे करीत आहेत. (वार्ताहर)
अपघातात दोन महिला ठार
By admin | Updated: November 30, 2014 00:56 IST