फाेटाे : १५ संजय शेटे
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : पाडळी (ता. शिराळा) येथे रुग्णवाहिका व दुचाकीची समाेरासमाेर धडक हाेऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार संजय पोपट शेटे (वय ४०, रा. शिराळा) ठार झाला. याप्रकरणी रुग्णवाहिका चालक अब्दुलरहीम निजाम सयदेखान (वय ५८, रा. शिरशी) याला शिराळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना बुधवार, १५ रोजी दुपारी १ वाजता घडली.
शिरसी प्राथमिक केंद्राची नवीन रुग्णवाहिका (एमएच १० सीआर ८२६६) शिराळावरून शिरसीकडे जात होती, तर संजय शेटे हे अंत्री येथून दुचाकीवरून (एमएच १० एक्स ६१८०) शिराळाकडे येत हाेते. पाडळी हद्दीतील वळणावर रुग्णवाहिका व दुचाकीची समाेरासमाेर धडक झाली. अपघातात दुचाकीस्वार संजय शेटे हे गंभीर जखमी झाले. उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. मृत संजय शेटे यांचा प्लम्बिंगचा व्यवसाय होता. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.