मिरज : बेळंकी (ता. मिरज) येथे म्हैसाळ योजनेच्या कालव्यात नागाप्पा निंगाप्पा कोळी (वय ४२, रा. एकुंडी, ता. जत) या दुचाकीस्वाराचा मृतदेह आढळला.
सलगरे ते बेळंकीच्या सीमेलगत असलेल्या म्हैसाळ योजनेच्या कालव्यात गुरुवारी सायंकाळी पाच वाजता पाण्याच्या प्रवाहात एक बेवारस दुचाकी सापडली होती. दुचाकीला असलेल्या एका पिशवीत नागाप्पा निंगाप्पा कोळी (एकुंडी, ता. जत) असे नाव असलेले बँक पासबुक, आधारकार्ड व इतर साहित्य सापडले. दुचाकीस्वार कोळी यांचा पोलिसांनी शोध घेतला. मात्र, ठावठिकाणा लागला नाही. धोकादायक वळण लक्षात न आल्याने हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी आढळले. मात्र, शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास कालव्यात एक मृतदेह आढळल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली. नातेवाईकांनीही मृतास ओळखले. रात्रीच्या वेळी अपघात होऊन कोळी दुचाकीसह कालव्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. याबाबत ग्रामीण पोलिसांत नोंद आहे.