इस्लामपूर : शिरटे (ता. वाळवा) येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व चांदीचा ऐवज अशा दोन लाख रुपये किमतीच्या ऐवजाची चोरी केली. ही घटना सोमवारी रात्री ते मंगळवारी पहाटेदरम्यान घडली.
याबाबत दिव्यराज जयवंत पवार (वय २०, रा. पाटील गल्ली, शिरटे) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पवार यांचे वडील औषधोपचारासाठी कराड येथे नातेवाइकांकडे थांबले होते. त्यांच्यासोबत दिव्यराज यांची आई आणि बहीण राहिली होती. त्यामुळे दिव्यराज दिवसभर शिरटे येथे थांबून रात्री घराला कुलूप लावून वडिलांच्या सेवेसाठी कराडला जात होते. मंगळवारी सकाळी चुलत बहीण ऋतुजा हिने फोन करून घराचा दरवाजा उघडा दिसत असल्याची माहिती दिली.
त्यानंतर दिव्यराज पवार शिरटे येथे आले. त्यांना घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले. घरातील साहित्य चोरट्यांनी विस्कटून टाकले होते. कपाटामधील सर्व साहित्य जमिनीवर टाकून चोरट्यांनी कपाटातील सोन्याच्या पाटल्या, अंगठ्या, नेकलेस, कर्णफुले, गंठण या सोन्याच्या दागिन्यांसह चांदीचा मेखला अशा ऐवजाची चोरी केल्याचे स्पष्ट झाले.