ठाणे : शासकीय यंत्रणेतील उच्च पदावरील अधिका-यांना त्यांच्या दर्जाद्वारे वाहनांवर दिवे लावण्याचे अधिकार आहेत. नुकतेच नव्या जीआरनुसार त्यांच्या दर्जानुसार लाल, निळा, अंबर असे वर्गीकरण करून ते दिवे लावण्याबाबत त्यांना सूचना केल्या आहेत. त्या सूचनांचे पालन होत नसल्याने जिल्ह्यात बहुसंख्य शासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनांवर अंबर दिवे दिसत आहेत. सूचनांप्रमाणे शासकीय वाहनांवर दिवे तत्काळ लावण्याचे आवाहन ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) केले आहे. शासन परिपत्रकानुसार दिव्यांचे वर्गीकरण केले आहे. यामध्ये फ्लॅशर असलेला लाल दिवा हा राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य न्यायाधीश आदींच्या वाहनांवर तर विधान परिषदेचे उपसभापती, विधानसभा उपाध्यक्ष, मंत्री, राज्यमंत्री, लोकसेवा आयोग अध्यक्ष, मुख्य माहिती आयुक्त आदींच्या वाहनांवर फ्लॅशरविना लाल दिवा तसेच अप्पर सचिवांपासून पोलीस महासंचालक, जिल्हा परिषद अध्यक्ष, अ व ब वर्ग पालिका महापौर-आयुक्त, प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या वाहनांवर फ्लॅशरविना अंबर दिवा लावण्यास सांगितले. रुग्णवाहिकांना जांभळ्या काचेमध्ये लुकलुकणारा लाल दिवा, अग्निशमन वाहनांसाठी फ्लॅशरसह अंबर दिवा, आपत्कालीन देखभाल व्यवस्थेतील कर्तव्यासाठी लाल-निळा आणि पांढरा असे बहुविध रंगांचे दिवे लावण्यास सांगितले आहे. नव्या जीआरचे काटेकोर पालन व्हावे, याबाबत जिल्ह्यात गुरुवारपासून दिवे तपासणी मोहीम हाती घेतली आहे. (प्रतिनिधी)
दोन गटांना दोन खासदारांची ताकद
By admin | Updated: September 25, 2014 00:33 IST