सांगली : शहरातील शंभरफुटी रोडवर असलेल्या त्रिमूर्ती चौकीजवळ असलेले एटीएम फोडून चोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना अटक करण्यात आली. विनायक ध्रुवकुमार शिंदे (वय २६, रा. समर्थ सदन अपार्टमेंट, स्फूर्ती चौक, सांगली) व चेतन रामचंद्र पोळ (२६, रा. रामकृष्ण परमहंस सोसायटी, सांगली) अशी संशयितांची नावे आहेत. विश्रामबाग पाेलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, विश्रामबाग पोलिसांचे पथक शुक्रवारी रात्री शंभरफुटी रोडवर गस्तीवर होते. यावेळी रात्री पावणेबाराच्या सुमारास त्रिमूर्ती चौकीजवळ असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये दोघे संशयित एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत होते. ही बाब लक्षात येताच गस्तीवरील पोलिसांनी अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. त्यानुसार पथकाने दोघांना एटीएममध्ये चाेरी करताना पकडले. यावेळी त्यांच्याकडून कटावणी, हातमोजे व दुचाकी जप्त करण्यात आली आहे. त्यांच्यावर विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, निवास कांबळे, सचिन ऐवळे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.