सांगली : रस्त्याकडेला असलेल्या दिशादर्शक फलकांची चोरी करणाऱ्या कवठेमहांकाळ येथील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. हर्षवर्धन आण्णासाहेब ढबू (वय ३५, रा. काळे प्लाॅट, कवठेमहांकाळ) आणि दिगंबर नानासाहेब सुतार (२९, रा. झुरेवाडी, ता. कवठेमहांकाळ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून ३४ हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे.
घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यातील तपासाच्या सूचना पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिल्या आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक कवठेमहांकाळ भागात पेट्रोलिंगवर होते. यावेळी ढबू याच्या नरघोल रस्त्यावरील शेडमध्ये पंढरपूर रोडवरील चोरून आणलेले फलक असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकला असता तिथे वेगवेगळे फलक आढळून आले.
ढबू याची मोटार रस्त्याच्या कामासाठी भाड्याने आहे. गेल्यावर्षी त्याने फलक चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ३४ हजार २० रुपये किमतीचे फलक जप्त करण्यात आले आहेत. एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.