कुपवाड : शहरातील कुमार चंद्रकांत कोष्टी (रा. उल्हासनगर) या मोबाइल दुकानदारास शिवीगाळ, मारहाण करून दोन अज्ञातांनी लुटले होते. याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. सूरज रमेश काळे (वय २४, रा. जुना बुधगाव रोड, कुपवाड), राज अहमद महेबूब शेख (वय २१, रा. रामकृष्णनगर, कुपवाड), अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी कुमार कोष्टी हे रविवारी (दि. १२) रात्री मोबाइल दुकान बंद करून घरी जात होते. यावेळी दोन अज्ञातांनी मेमरी कार्ड उधार मागितले. त्यास त्यांनी नकार दिला. मेमरी कार्ड उधार न दिल्याने दोघांनी शिवीगाळ, मारहाण करून त्यांना लुटले होते. याप्रकरणी कुपवाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी तातडीने पथक तयार करून गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पथकाने बारा तासांत संशयित सूरज काळे, राज अहमद शेख या दोघांना मुद्देमालासह अटक केली.