कडेगाव : सांगली, सातारा जिल्ह्यात खून, जबरी चोरी, दरोडा, मारामारी प्रकरणात गेल्या १२ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस चिंचणी-वांगी पोलिसांनी शिताफीने पकडले आहे. नव्या उर्फ नवनाथ लत्या काळे (रा. कोकराळे, ता. खटाव, जि. सातारा) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर सांगली व सातारा जिल्ह्यात खून, जबरी चोरी, दरोडा, मारामारी असे गुन्हे दाखल आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी रेकॉर्डवरील फरार आरोपी पकडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार चिंचणी-वांगी पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असणारा व फरार असलेला आरोपी यास अटक करण्यात आली आहे. नवनाथ काळे हा औंध परिसरात आल्याची माहिती गोपनीय खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अंकुश इंगळे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली २७ मार्च रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सापळा रचण्यात आला. पोलीस हवालदार अमर जंगम, पोलीस शिपाई जगदीश मोहिते, राहुल कुंभार, सतीश पाटील यांनी औंध पोलिसांचे मदतीने नवनाथ काळे याला अटक केली.