ओळी : महापालिकेच्या आशा वर्करांना क्षयरुग्ण शोध मोहिमेचे मंगळवारी प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी डाॅ. रवींद्र ताटे, नितीन देसाई उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका क्षेत्रात बुधवारपासून सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम सुरू होत आहे. आशा वर्कर आणि स्वयंसेवक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी आशा वर्करांना प्रशिक्षण देण्यात आले. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत ‘सक्रिय कुष्ठरुग्ण शोध व नियमित संनियंत्रण’ तसेच राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत ‘सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम’ या एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय राज्य स्तरावर घेण्यात आला आहे. या संयुक्त मोहिमेत प्राथमिक अवस्थेतील कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधून उपचाराखाली आणणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.
महापालिकेच्या आशा वर्कर व स्वयंसेवक बुधवार १४ जुलैपासून घरोघरी जाऊन क्षयरुग्ण शोधणार आहेत. महापालिकेत आशा वर्कर यांना त्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. दोन वर्षांवरील वयाच्या व्यक्तीची तपासणी केली जाणार आहे. शहर क्षयरोग अधिकारी डॉ. रवींद्र ताटे, डॉट्स, टीबी, एचआयव्ही सुपरवायझर नितीन देसाई, आरोग्य सेवा विभाग कृष्ठरोग विभागाचे पर्यवेक्षक बी.पी. देवकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सपना देशपांडे, अनिल चव्हाण, मुस्तफा शेख, अनिल वाघमारे, ऋतुजा पाटील, एम. एम. शेख, सतीश निकम, पी. बी. लोंढे, एम. आर. सय्यद, व्ही. बी. टोकले, गजानन गारे उपस्थित होते.