जी. डी. बापूंच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे संघर्ष आणि हाच पैलू शरदभाऊंनी मनापासून स्वीकारला. तो स्वतःसाठी नाही, तर सर्वसामान्यांसाठी. सुरुवातीपासूनच त्यांनी वैचारिक पाळेमुळे असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो युवकांचे संघटन केले. या संघटनात्मक शक्तीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवली. या सर्वांची दखल घेऊन राष्ट्रवादीने त्यांना युवक जिल्हाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी दिली. येथूनच त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याची खरी सुरुवात झाली.
तालुक्यातील पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांनी नेतृत्व केले. शरदभाऊंच्या कामाचा व्याप आणि उरक पाहून पालकमंत्री जयंत पाटील यांनी त्यांंना जिल्हा परिषदेत काम करण्याची संधी दिली आणि त्यांनी या संधीचे सोने केले. या निवडणुकीत विक्रमी मताधिक्क्याने ते निवडून आले आणि क्रांतिअग्रणींच्या तिसऱ्या पिढीतील ज्योत पुन्हा राजकारणात सक्रिय झाली.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी लाखो रुपयांचा निधी मतदार संघात आणला. दलित विकास निधी, शिक्षण, रस्ते बांधकाम व दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद गणात सर्वात जास्त निधी आणून एक सक्रिय सदस्य म्हणून त्यांनी आपली ख्याती मिळवली. तसेच जिल्हा परिषदेत सामाजिक प्रश्नांवर नेहमी आवाज उठवत, ते मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही वाईट गोष्टीला किंवा कृत्याला कधीही पाठीशी घातले नाही. चांगल्याला चांगले म्हणत कार्यकर्त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. यातून अनेक कार्यकर्ते घडले. भाऊंच्यारूपाने समाजकार्याचा वसा घेऊन काम करणारा सच्चा लाेकसेवक कार्यकर्त्यांना मिळाला आहे.
वडील आमदार अरुणअण्णा लाड यांच्याकडून अलगदच भाऊंकडे सामाजिक विचारांचा, जाणिवेचा वारसा आला आहे. त्यामुळे लहानांपासून तरुणांपर्यंत आणि अबाल-वृद्धांपर्यंत त्यांच्याप्रति आत्मियता जाणवते. भाऊंची एक दिलदार आणि सच्चा दोस्त म्हणूनही त्यांच्या मित्रांमध्ये ख्याती आहे.
अरुणअण्णा लाड नुकतेच विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून आले. त्यांच्या या निवडणुकीचे शिवधनुष्य शरदभाऊंनी खंबीरपणे पेलले. पाच जिल्ह्यात असणाऱ्या या मतदार संघातील प्रत्येक मतदारापर्यंत कशा पद्धतीने पोहोचता येईल, यासाठी त्यांनी मायक्रो प्लॅनिंग केले. यावेळी ही जागा महाविकास आघाडीकडून असल्याने पाचही जिल्ह्यातील सर्व मित्रपक्षांतील नेतेमंडळी, कार्यकर्ते यांच्याशी सुसंवाद साधून, कोणालाही नाराज न करता खुबीने रणनीती आखली. मुळात भाऊंचा स्वभावच मृदू असल्याने त्यांच्याकडे जनसमुदाय आपसूकच आकर्षित होतो. त्यामुळे त्यांनी हे सहज केले आणि आपल्या वडिलांच्या गळ्यात विजयाची माळ घातली. लाड कुटुंबियांसह कुंडल आणि पंचक्राेशीतील तमाम नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यावेळी अण्णा व भाऊंकडे पाहून प्रत्येकाच्या ताेंडी एकच वाक्य असे, ‘मुलगा असावा तर असा’
कारण वडिलांचे स्वप्न आपले स्वप्न समजून जीव ओतून काम करून विजयश्री मिळविणे, हे फक्त संयमी, तत्त्वनिष्ठ आणि लढवय्या बाण्याचे कार्यकर्तेच करू शकतात. नेतृत्वाची हीच चुणूक या निवडणुकीच्या निमित्ताने शरदभाऊंमध्ये पाहायला मिळाली.
ध्येयवेड्या, कर्तबगार, मनमिळावू, अजातशत्रू, मितभाषी, कार्यनिष्ठ आणि तत्त्वनिष्ठ, लोभस व्यक्तिमत्त्वाच्या शरदभाऊंना भविष्यात जिल्ह्याच्या तसेच राज्याच्या राजकारणात काम करण्याची संधी मिळावी, एवढीच यानिमित्ताने अपेक्षा आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा!
- अशुतोष कस्तुरे. कुंडल