येडेनिपाणी येथील मल्लिकार्जुन डोंगरावर शाहू प्रबोधिनी व जगदंब ट्रेकर्सच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डॉ. विक्रांत पाटील, संदीप शिंदे, श्रीशैल चव्हाण, आनंद शिंदे, रणजित पाटील, डॉ. विक्रांत खोत, शंभुराजे पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील राजर्षी शाहू प्रबोधिनी व जगदंब ट्रेकर्स यांच्या वतीने ‘आईचे झाड’ या संकल्पनेतून येडेनिपाणी येथील मल्लिकार्जुन डोंगरावर १ हजारांहून अधिक वृक्षलागवड करण्याचा संकल्प डॉ. विक्रांत पाटील, संदीप शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे.
या दोन्ही संस्थांमार्फत प्रत्येक वर्षी वृक्षलागवड आणि संवर्धनाचे उपक्रम राबविले जातात. पर्यावरण संतुलन, तापमानातील वाढ आणि प्रदूषणाचे प्रमाण कमी करून मुुबलक प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती करण्यासाठी आतापर्यंत १,२८४ रोपांची लागवड करून त्यांची जोपासना केली गेली आहे.
माणिकवाडी येथील डोंगरावर १ हजार झाडे लावून ती परिपूर्णपणे संवर्धित केली आहेत. ‘आईचे झाड’ या संकल्पनेतून या वृक्षारोपनाच्या सामाजिक कार्यासाठी प्रत्येकाने १ झाड भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शाहू प्रबोधिनी व जगदंब ट्रेकर्सकडून गड व किल्लेसंवर्धन, प्रेक्षणीय स्थळांची स्वच्छता मोहीम राबवून वृक्षारोपण केले जाते. जगदंबच्या मावळ्यांनी मल्लिकार्जुन डोंगरावर श्रमदानही केले. यावेळी श्रीशैल चव्हाण, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद शिंदे, रणजित पाटील, डॉ. विक्रांत खोत, शंभुराजे पाटील, मोहन जाधव, विनय केंगार, अभय थोरात, अजित येडगे, सलीम मुल्ला उपस्थित होते.