सांगली : तासगाव पोलिसांच्या कोठडीतून पसार झाल्यानंतर पुन्हा पोलिसांना सापडायचे नाही, असा निश्चय करुन विट्यापर्यंत भर पावसात आणि काळोख्या अंधारात शेतातील पिकांमधून प्रवास केला. तिथे आमची फाटाफूट झाली, अशी कबुली अटकेत असलेल्या तीनही दरोडेखोरांनी दिली आहे. दरम्यान, कोठडीतून पलायन केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयाने त्यांची रविवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.पुसेगाव (ता. खटाव, जि. सातारा) येथील कुमार पवार, राहुल माने व राजेंद्र जाधव यांना तासगाव पोलिसांनी अटक केली होती. ३१ मे रोजी रात्री साडेअकराला वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला होता. वाऱ्यामुळे विजेचा पुरवठा खंडित झाला होता. याची संधी साधून त्यांनी कोठडीच्या छतावरील कौले काढून पलायन केले होते. ते पळून गेले, त्यावेळी पाऊस सुरु होता. त्यांनी आपला पोलीस पाठलाग करणार, असा विचार करुन शेतातून प्रवास करण्याचा निर्णय घेतला. रात्री एक वाजता त्यांनी शेतातून पायी प्रवास सुरु केला होता. शेत मोकळे दिसले की, ते पळायचे. पीक असेल तर वाट काढत हळू हळू जायचे.पहाटेपर्यंत ते विट्यात गेले. तोपर्यंत पाऊस बंद झाला होता. तेथून त्यांनी फाटाफूट होऊन स्वतंत्रपणे पुढे जाण्याचा निर्णय घेतला. सातारा जिल्ह्यातच जाऊन कुठे तरी काम करण्याचा त्यांनी निश्चय केला होता. मात्र तोपर्यंत ते सातारा पोलिसांच्या जाळ्यात सापडले. पण त्यांनी पळून जाण्याचे धाडस का केले? याचा उलगडा झालेला नाही. (प्रतिनिधी)आज ताबा घेणार!पळून गेलेल्या गुन्ह्यात त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. तासगाव पोलीस सोमवारी त्यांच्याकडे दाखल असलेल्या वाटमारीच्या गुन्ह्यात पुन्हा त्यांना अटक करणार आहेत. सायंकाळी त्यांची सांगलीच्या शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
तासगाव ते विट्यापर्यंत शेतातून पायी प्रवास
By admin | Updated: June 8, 2015 00:50 IST