लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : माणसातला जीव गेला की त्याला स्मशानभूमीत आणले जाते. काळवंडलेले खांब, इमारत, अस्वच्छता, पडझड यामुळे स्मशानभूमीही मरणासन्न स्थितीत असतात. महापुरात तर त्यामध्ये भर पडली. त्यामुळे निर्धार फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत कल्पकतेने व कष्टाने या स्मशानभूमीत जीव ओतून त्यांचा कायापालट केला.
स्मशानभूमींच्या भिंती, खांब, छत, परिसरातील झाडे या सर्वांना रंगरंगोटी करण्याचे काम फाऊंडेशनने सहा दिवसांपूर्वी हाती घेतले. सांगली शहरात सलग बाराशे दिवस शहर स्वच्छतेसाठी झटणाऱ्या निर्धार फाऊंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डणावर यांच्या वाढदिवसानिमित्त पूरबाधित सांगलीतील अमरधामसह हरीपूर, अंकली, जुनी धामणी या चार ठिकाणच्या स्मशानभूमींची रंगरंगोटी करून सुशोभिकरण करण्यात आले. इतक्यावर न थांबता स्वच्छता संदेश, सुविचार, प्रदूषणविरोधातील प्रबोधन, घोषवाक्येही लिहिली. या चारही स्मशानभूमींची वाताहत झाली होती. पूर ओसरल्यानंतर तेथे साफसफाई केली होती. तरीही स्मशानभूमींचे बकालपण खराब इमारतींमुळे स्पष्ट दिसत होते. त्यांचा कायापालट झाला.
अमरधाम स्मशानभूमीला महापौर दिग्विजय सूर्यवंशी, युवा नेते जितेश कदम, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पवार, हरीपूर स्मशानभूमीला अरविंद तांबवेकर, अंकली स्मशानभूमीला पोलीस उपअधीक्षक अजित टिके, सांगली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, सरपंच व ग्रामस्थ आणि जुनी धामणी स्मशानभूमीला आमदार उल्हास पाटील यांनी भेट देऊन कामाचे कौतुक करत सत्कारही केला.
या टीममधील अनिल अंकलखोपे, वसंत भोसले, सतीश कट्टीमणी, रोहित कोळी, नयन कोलप, प्रथमेश खिलारे, मनोज नाटेकर, सुरज कोळी, अजिंक्य रोपळकर, अनिरुद्ध कुंभार यांचा कुटुंबीयांसमवेत आमदार सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.