)-------------------------------
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : बक्षीसपत्राची सिटी सर्व्हेस नोंद घेऊन त्याचा सिटी सर्व्हे उतारा देण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करून ७५ हजारांची लाच स्वीकारताना सांगलीच्या नगरभूमापन अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडण्यात आले. सुरेश शिवमूर्ती रेड्डी (वय ४८, रा. गव्हर्नमेंट कॉलनी, विश्रामबाग, सांगली) असे अधिकाऱ्याचे नाव असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नगर भूमापन कार्यालयात सापळा लावून ही कारवाई केली.
तक्रारदाराच्या वडिलांनी त्यांच्या व भावाच्या नावाने बक्षीसपत्र करून मालमत्ता लिहून दिली होती. या बक्षीसपत्राची सिटी सर्व्हे उताऱ्यावर नोंद होऊन त्याचा सिटी सर्व्हे उतारा मिळण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता. यावेळी नगरभूमापन अधिकारी सुरेश रेड्डी याने तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने याबाबतचा तक्रार अर्ज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिला होता. त्यानुसार पडताळणी केली असता, रेड्डी याने एक लाख रुपयांची मागणी करून ७५ हजार रूपये घेऊन येण्यास सांगितले होते. त्यानंतर ‘लाचलुचपत’च्या पथकाने नगरभूमापन कार्यालयात सापळा लावून ७५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यास रंगेहाथ पकडले. रेड्डी याच्यावर विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक प्रशांत चाैगुले, अविनाश सागर, सलीम मकानदार, रवींद्र धुमाळ, संजय संकपाळ, संजय कलकुटगी यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
चौकट
लाच मागितल्यास संपर्क साधा
कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामाच्या बदल्यात लाचेची मागणी केल्यास विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन उपअधीक्षक सुजय घाटगे यांनी केले आहे.