कडेगाव : पलूस-कडेगाव मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे निर्विवाद
वर्चस्व असावे असे माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे स्वप्न होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कडेगाव तालुक्यातील ९ ग्रामपंचायती आणि पलूस तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींवर काँग्रेसने झेंडा फडकविला. यामुळे पतंगराव कदम यांचे स्वप्न पूर्ण होत असल्याची भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.
कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने हे घवघवीत यश मिळविले. पलूस तालुक्यात काही गावांत राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी केली
होती. मात्र, एकंदरीत निकाल पाहता पतंगराव कदम यांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने काँग्रेसची ही वाटचाल सुरू झाली आहे. हे यश पतंगराव कदम यांनी राजकारणात केलेल्या संघर्षाचे, त्यांनी केलेल्या जनसेवेचे, तसेच डॉ. विश्वजित कदम यांच्या कार्यक्षम नेतृत्वाचे व आमदार मोहनराव कदम यांच्या मार्गदर्शनाचे फलित आहे.