कोकरुड : कोकरुड (ता. शिराळा) येथील ग्रामीण रुग्णालयाचा अनागोंदी कारभार व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार वागण्याला कंटाळलेल्या तरुणांनी आज (बुधवार) रुग्णालयास टाळे ठोकले. जोरदार घोषणाबाजी करत परिसर दुमदुमून सोडला. या तरुणांच्या आंदोलनाला रुग्णांनीही समर्थन दिले.येथील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार एकाच इमारतीत चालतो. येथे सौ. एस. ए. इनामदार या ग्रामीण रुग्णालयाचे कामकाज पहात होत्या. परंतु तीन महिन्यांपूर्वी त्यांना शिराळा येथे प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले. त्यांना तीन दिवस शिराळा व तीन दिवस कोकरुड येथील काम पहावे, असे आदेश देण्यात आले होते. मात्र त्या शिराळा येथेच कार्यभार पहात आहेत. कोकरुडला येत नव्हत्या, अशी रुग्णांची तक्रार आहे.प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. के. पाटील यांना तीन महिन्यांपासून सुट्टीच न मिळाल्याने ते गेल्या आठ दिवसांपासून रजेवर आहेत, तर डॉ. विलास रावळ हे गेल्या वर्षभरापासून शिराळा येथे बदली होऊन गेल्यापासून त्यांची जागाही रिक्तच आहे. परिणामी येथे रुग्णांना आरोग्य सेवा मिळत नव्हती. यामुळे संतप्त तरुणांनी आज आरोग्य केंद्राला टाळे ठोकले. यावेळी डॉ. इनामदार यांनी चर्चेला न येता शासनाच्या आयुष मोहिमेकडे ११ महिन्यांच्या नियुक्तीवर असणाऱ्या डॉ. सौ. गायत्री यमगर यांना पाठविले. मात्र युवकांनी त्यांच्याशी चर्चा न करता त्यांना परत जाण्यास भाग पाडले.या आंदोलनाची माहिती समजताच जि. प. सदस्य रणधीर नाईक यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी राम हंकारे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी हंकारे यांनी सौ. इनामदार यांची शिराळा येथील प्रतिनियुक्ती रद्द करून तत्काळ कोकरुड येथे जाण्याचे आदेश देऊ, असे स्पष्ट केले. या बाबत माजी जि. प. सदस्य सत्यजित देशमुख यांनीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिकराव सागळे यांना माहिती दिली. आंदोलनात कृष्णा नांगरे, तानाजी घोडे, नथूराम कोळवनकर, विलास नांगरे, दत्ता घोडे, तानाजी पवार, प्रदीप गोधडे, अर्जुन जाधव, रणजित देसाई, कृष्णात शिपेकर, बाबासाहेब चांदण सहभागी झाले होते. (वार्ताहर)
कोकरुड प्राथमिक आरोग्य केंद्राला युवकांकडून टाळे
By admin | Updated: December 17, 2014 22:56 IST