विटा : दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या विट्यातील दोन देवांच्या ऐतिहासिक व उत्साहवर्धक पालखी शर्यतीचा सोहळा उद्या, शुक्रवारी विजयादशमीदिवशी (दसरा) साजरा होत असून यावेळी विधानसभेची आचारसंहिता असल्याने या पालखी शर्यतीवर प्रशासनाने करडी नजर ठेवली आहे. सोहळ्यासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या पालखी शर्यतीचे प्रशासनाच्यावतीने व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे.विजयादशमीला एकाच देवस्थानाच्या पालख्यांची शर्यत असते. एका मैलाच्या अंतराची आणि अवघ्या १५ मिनिटांची रोमहर्षक आणि अटीतटीची पालखी शर्यत पाहण्यासाठी लाखो भाविक शहरात येतात. विटा येथील श्री रेवणसिध्द आणि मूळ स्थान रेवणसिध्द देवाची अशा एकाच देवाच्या दोन पालख्यांची विटा व सुळेवाडी या गावात शर्यतीची अनोखी परंपरा आहे. विजयादशमीदिवशी मूळ स्थानची श्री रेवणसिध्द देवाची पालखी विट्यातील श्री भैरवनाथ मंदिरात येते. मूळ स्थान व विटा येथील श्री रेवणसिध्द या दोन पालख्यांची एकत्रित आरती केली जाते. त्यानंतर काळेश्वर मंदिरापासून या पालख्यांची शर्यत सुरू होते.शुक्रवारी सायंकाळी चार वाजता पालखी शर्यती होणार आहेत. सध्या विधानसभेची आचारसंहिता सुरू असल्याने या शर्यतीवेळी आचारसंहिता भंग केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा प्रांताधिकाऱ्यांनी दिला आहे. शर्यतीसाठी विटा नगरपालिका प्रशासनाने शिलंगण मैदान सज्ज केले असून पालखी मार्गावरील अडथळे दूर करण्यात आले आहेत. (वार्ताहर)
विट्यामध्ये आज पालख्यांची शर्यत
By admin | Updated: October 2, 2014 23:48 IST