सांगली : जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा विळखा घट्ट होत असल्याचे दिसत आहे. गुरुवारी आणखी दोन रुग्णांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तानंग (ता. मिरज) येथील महिला, तसेच इस्लामपूर व उगार खुर्द (ता. अथणी) येथील पुरुषांचा समावेश आहे. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय, तसेच इस्लामपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.तानंग येथील महिला व उगार खुर्द येथील एकजण दोन दिवसांपूर्वी स्वाइन फ्लू संशयित म्हणून दाखल होते. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला. यामध्ये त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे म्हटले आहे. दोघांना पंधरवड्यापासून ताप व खोकल्याचा त्रास सुरु आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण प्रकृतीत सुधारणा नसल्याने स्वाइनची लागण झाल्याच्या संशयावरून त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तपासणीत स्वाईनची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक उपचार सुरु केले आहेत. इस्लामपूर येथील रुग्ण महिलाही पंधरवड्यापासून आजारी आहे. तिलाही स्वाइनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या तीनही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. गेल्या आठवड्यात कोथळी (ता. शिरोळ) येथील सारिका केंगार व वायफळे (ता. तासगाव) येथील रत्नाकर फाळके या दोन स्वाइन संशयित रुग्णांचा मृत्यू झाला होता. तपासणी अहवालात त्यांना स्वाइनची लागण झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचीही तपासणी करण्यास सांगितले आहे. (प्रतिनिधी)...पंधराजणांचा मृत्यूनऊ महिन्यांत जिल्ह्यात ६५ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. यातील पंधरा रुग्णांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे, तर ५० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत मृतांचा आकडा वाढला असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे आणखी तीन रुग्ण दाखल
By admin | Updated: September 24, 2015 23:58 IST