सांगली/संजयनगर : येथील संजयनगरमध्ये मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. गत आठवड्यात तीन बालकांच्या शरीराचे लचके तोडल्याची घटना ताजी असतानाच खेराडकर पंपाजवळील अभंग लहू लोखंडे (वय ३ महिने) या बालकास कुत्र्याने घरात घुसून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. नातेवाईक आल्याने पुढील अनर्थ टळला; पण तोपर्यंत कुत्र्याने या बालकाच्या शरीराचे आठ ठिकाणी लचके तोडले. लोखंडे कुटुंबातील लोक पहाटे पाच वाजता उठले होते. सर्वजण आवरत होते. घराचा मुख्य दरवाजा उघडा होता. अभंग झोपला होता. एक भटके कुत्रे त्यांच्या घरात शिरले. त्याने अभंगच्या डाव्या पायाचे सहा ठिकाणी लचके तोडले. तोंडात पाय धरून त्याला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. अभंग रडू लागल्याने घरातील लोक धावत आले. त्यांनी कुत्र्याला हुसकावून लावले. अभंग रक्तबंबाळ झाला होता. हा प्रकार पाहून घरातील लोक घाबरून गेले. त्यांनी अभंगला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविले; पण तिथे उपचाराची सोय नसल्याने त्याला पुन्हा सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. लहान मुलास कुत्र्याने पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त समजताच लोखंडे यांच्या घराजवळ मोठी गर्दी झाली होती. नागरिकांनी त्या कुत्र्यास शोधण्याचा प्रयत्न केला; पण ते कुठेच सापडले नाही. गेल्या आठवड्यात चार लहान मुलांवर कुत्र्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर शेळ्यांवरही ते हल्ले करीत आहेत. आरोग्य अधिकारी या परिसरात राहत असूनही त्याचा काहीच उपयोग होताना दिसत नाही. रात्रीच्यावेळी तर नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. वाहनांचाही ते पाठलाग करतात. आयुक्तांची तत्परता संजयनगरमध्ये गेल्या आठ दिवसांपासून मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. रविवारच्या या घटनेनंतर नागरिकांनी परिसरातील नगरसेवक व आरोग्य अधिकारी डॉ. सुनील अंबोळे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला; पण त्यांनी मोबाईल घेतला नाही. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराविषयी नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी तातडीने याठिकाणी डॉग व्हॅन पाठविली. आणखी काही मदत पाहिजे का, अशी विचारणा केली. आरगेत दोन महिलांसह ११ जनावरांना कुत्र्याचा चावा टाकळी : तालुक्यातील आरग येथे पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने दोन महिला व अकरा जनावरे जखमी झाली. ग्रामस्थांनी पाठलाग करून एका कुत्र्यास ठार मारले. आरगेत रविवारी सकाळी पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेऊन लीलाबाई लक्ष्मण कोरे (वय ५०), श्रीमती शिंदे (४५) यांना जखमी केले. ईश्वर कोरे, आदिनाथ मोळे, अनिल कोरे यांची रेडी, राजू खंदारे, प्रकाश सटाले यांची म्हैस, शिवाजी नाईक यांची गाय, आदी अकरा जनावरांचा चावा घेतला. आरग येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात डॉक्टरांचे पद रिक्त असल्याने जनावरांवर उपचार करण्यासाठी ग्रामस्थांची धावपळ उडाली. पशुवैद्यकीय रुग्णालयात तातडीने डॉक्टरांची नियुक्ती करून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बी. आर. पाटील यांनी केली आहे.
तीन महिन्यांच्या बालकाचे कुत्र्यांनी लचके तोडले
By admin | Published: June 20, 2016 12:26 AM