ओळी :-
शहरातील आरोग्यविश्व कोविड सेंटरमध्ये कोरोनामुक्त झालेल्या मुलीला पुष्पगुच्छ देऊन घरी पाठविण्यात आले. यावेळी मंगेश चव्हाण, विजय आवळे, डाॅ. राजकुमार पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : येथील आरोग्यविश्व कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित बालकांवरही उपचार केले जात आहेत. आतापर्यंत तीन बालकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे, अशी माहिती नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी दिली.
युवक काँग्रेसच्यावतीने शहरात आरोग्यविश्व कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये ऑक्सिजनयुक्त ५० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाबाधित मुलेही या सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होत आहेत. आळते (ता. हातकणंगले) येथील तीन वर्षाची मुलगी उपचारासाठी दाखल झाली होती. ती नुकतीच कोरोनामुक्त होऊन घरी परतली. तसेच खणभागातील एक पाच वर्षाची मुलगी व एक सात वर्षाचा मुलगा हे दोघेही शुक्रवारी कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ८० हून अधिक रुग्ण या कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यातील ४० जणांनी कोरोनावर मात केली आहे.
डाॅ. बिंदूसार पलंगे, डाॅ. राजकुमार पाटील, डाॅ. प्रियंका शिंदे, अंकिता लोखंडे व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी बालकांवर उपचार केले. तसेच नगरसेवक मंगेश चव्हाण, माजी नगरसेवक किशोर लाटणे, विजय आवळे, अथर्व कऱ्हाडकर, अभिषेक शिंदे, गब्बर महात, कुणाल शंभोवाणीस, प्रीतम काबरा, विनायक लाटणे, सागर मुळे यांनी मुलांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न केले.