सांगली : वारणानगर येथील नऊ कोटींच्या चोरीतील मुख्य संशयित मैनुद्दीन अबुबकर मुल्ला याच्या खूनप्रकरणी सोमवारी आणखी तीन संशयितांना शहर पोलिसांच्या पथकाने अटक केली. शफीक अजमुद्दीन खलिफा (वय ४५, रा. ज्योतिबा मंदिराजवळ, सांगलीवाडी), नाना ऊर्फ बाळासाहेब दादासाहेब पुकळे (३७, रा. राणाप्रताप चौक, सांगली), अप्पा ऊर्फ भीमराव मल्लाप्पा वाणी (३६, झाशी कॉलनी, सांगलीवाडी) अशी संशयितांची नावे आहेत. दरम्यान, रविवारी अटक केलेल्या रवी हरी चंडाळे याला सहा दिवसांची पोलिीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मृत मैनुद्दीन मुल्ला हा वारणानगर येथील एका बंगल्यात २०१६ मध्ये झालेल्या ९ कोटी १८ लाख रोकड चोरी प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलिसांनी वारणानगरमध्ये छापा टाकले होता. या छाप्यावेळी त्यांनी ९ कोटी १८ लाख रुपयांवर डल्ला मारला होता. या प्रकरणी सांगली एलसीबीचे तत्कालीन निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक निरीक्षक सूरज चंदनशिवे, हवालदार शंकर पाटील, दीपक पाटील, रवींद्र पाटील, कुलदीप कांबळे, शरद कुरळपकर, मोहिद्दीन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
मैनुद्दीन मुल्ला हा सध्या जामिनावर होता. जुगाराचा क्लब सुरू करण्यासाठी तो सिव्हिल हॉस्पिटलजवळील गणेशनगर, रमामातानगर परिसरात जागा शोधत होता. यात त्याचा संशयित हल्लेखोरांशी आर्थिक कारणातून वाद झाला होता. या वादातूनच त्याचा काटा काढण्यात आला. रविवारी रात्री उशिरा रवी चंडाळे यास हैदरराबाद येथून अटक करण्यात आली. त्यानंतर सोमवारी इतर तीन साथीदारांना पोलिसांनी जेरबंद करण्यात यश मिळविले. रात्री उशिरा तिघांवर अटकेची कारवाई करण्यात आली.
चौकट
म्होरक्याला अटक
मैनुद्दीन मुल्ला खून प्रकरणात संशयित अप्पा ऊर्फ भीमराव मल्लाप्पा वाणी हा म्होरक्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुल्ला याच्यावर त्यानेच कोयत्याने वार केला. त्यानंतर इतर संशयितांनी हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.