सांगली : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविनाच पुढील वर्गात नेण्याच्या निर्णयावर पालक व शिक्षणतज्ज्ञांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. शासनाच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील साडेतीन लाख विद्यार्थी परीक्षेशिवाय उत्तीर्ण होणार आहेत.
गेले वर्षभर ऑनलाईन शिक्षणावरच ज्ञान मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पुरेसा अभ्यास झालेला नाही हे पालक, शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञही मान्य करत आहेत. या झालेल्या अभ्यासक्रमाच्या आधारे किमान विद्यार्थ्यांचे मूल्यमापन तरी होईल, अशी अपेक्षा होती, पण शिक्षणमंत्र्यांनी परीक्षा रद्दचा निर्णय जाहीर केल्याने पालकांमधून संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. जिल्ह्यात पहिली ते आठवीच्या वर्गात एकूण ३ लाख ४५ हजार ५२ विद्यार्थी आहेत. शिक्षण विभागाच्या सर्वेक्षणानुसार यातील अनेक विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नसल्याने त्यांचे ऑनलाईन शिक्षण होऊ शकले नाही, ही मुले आता कोणत्याही मूल्यमापनाविना थेट वरच्या वर्गात गेली आहेत.
गेल्यावर्षी अंगणवाडीनंतर पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना लॉकडाऊनमध्ये शाळा बंद असल्याने प्रत्यक्ष शाळेत जाता आलेच नाही, ही मुले आता थेट दुसरीला जाणार आहेत. शाळेचे तोंडही न पाहिलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसरीच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. आठवीच्या विद्यार्थ्यांचा पाया पक्का झालेला नसतानाच ते दहावीच्या दिशेने प्रवास करणार आहेत. यावर्षी पाल्याचे ऑनलाईन शिक्षण समाधानकारक न झाल्याने अनेक पालकांनी ड्रॉपचा निर्णय घेतला होता. यंदाची परीक्षा फक्त चाचणी स्वरुपात दिली जाणार होती, ही चाचणीदेखील आता होणार नाही.
पालक म्हणतात...
ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे, किमान त्यांच्यासाठी तरी ऑनलाईन परीक्षा घ्यायला हव्या होत्या. यानिमित्ताने विद्यार्थ्यांचे प्राथमिक मूल्यमापन झाले असते. विद्यार्थ्यांना कितपत आकलन झाले आहे, याचा नेमका अंदाज आता पालक आणि शिक्षक या दोहोंनाही नाही. विद्यार्थ्यांचा एका वर्षाचा पाया कच्चाच राहणार आहे. या वर्षातील गणित, इंग्रजी, शास्त्र या महत्वाच्या विषयांचे ज्ञान मागे ठेवूनच विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात जावे लागेल. गुणवत्तेच्यादृष्टीने हे धोकादायक आहे.
- प्रा. अर्जुन सूरपल्ली, पालक, सांगली
गेल्या वर्षभरातील मुलांची शिक्षणातील हेळसांड पाहून घरातच अभ्यास घेण्यावर भर दिला. अभ्यासक्रम घरातच पूर्ण करुन घेतला. आता परीक्षा रद्द झाल्या तरी बौद्धिकदृष्ट्या मुलाची वरच्या वर्गात जाण्याची तयारी पूर्ण झाली आहे. परीक्षा झाल्या तरी चालल्या असत्या. आता पुढील शैक्षणिक वर्षात तरी शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ नये, याची दक्षता शासन व शिक्षण विभागाने घेतली पाहिजे. मुलांचे हे शैक्षणिक नुकसान भरुन येण्यासारखे नाही.
- अयुब निशाणदार, पालक, मिरज
परीक्षा न झाल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले, ते पुढील वर्षी भरुन काढावे लागेल. त्यासाठी प्रसंगी जादा तास, जादा वर्ग शिक्षण विभागाने घ्यावेत. विशेषत: पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास व परीक्षा न होणे योग्य नाही. तिसरी व चौथीत पाया पक्का होत असल्याने या वर्गांचा अभ्यासदेखील पुन्हा घेणे आवश्यक आहे. सध्या आरटीईनुसार परीक्षा होतच नाहीत, पण मूल्यमापन केले जाते. तेदेखील यंदा न झाल्याने विद्यार्थ्यांचा गुणवत्तेविषयी प्रश्न उपस्थित होऊ शकतात.
- विराज कर्नाळे, पालक, सांगली
शिक्षणतज्ज्ञ म्हणतात...
परीक्षेअभावी राहिलेला अभ्यास पुन्हा घ्यावा लागेल. पहिलीचे विद्यार्थी शाळेचे तोंडही न पाहता थेट दुसरीच्या वर्गात गेले आहेत, त्यांचाही विचार व्हायला हवा. यासाठी येत्या शैक्षणिक वर्षात प्रसंगी जादा तास घ्यावेत. सुट्ट्या कमी करुन अधिकाधिक अध्यापनाकडे लक्ष द्यावे लागेल. परीक्षेपेक्षा विद्यार्थ्यांचे ज्ञान महत्त्वाचे आहे. त्यांच्या आकलनाचा निकष ठरविण्यासाठी परीक्षा हे एक माध्यम आहे. तिचा बाऊ करण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला महत्त्व द्यायला हवे.
- नामदेव माळी, सांगली
- यानिमित्ताने खरंतर सध्याच्या बुद्धी आणि ज्ञानाशी पूर्णपणे फारकत घेतलेल्या व नारायण मूर्ती म्हणतात तसे ९० टक्के नोकरी देण्याच्याही लायक पदवीधर तयार करू न शकणाऱ्या परीक्षा पद्धतीचे संपूर्ण पुनर्निरीक्षणच करायला हवे. परीक्षेच्या भोवती फिरणाऱ्या शिक्षणाला कोरोनाने विराम दिला, ही चांगली गोष्ट मानायला हवी. परीक्षा म्हणजे शैक्षणिक सर्वस्व नव्हे हे कोरोनाच्यानिमित्ताने सर्वांच्याच लक्षात आले, हे सुदैवच म्हणूया.
- प्रा. डाॅ. श्रीपाद जोशी, जत.
पाॅईंटर्स
विद्यार्थी संख्या
पहिली - ३९,५२६, दुसरी - ४२,६२७, तिसरी - ४३,६५८, चौथी - ४३,६१५, पाचवी - ४४,४८३, सहावी - ४३,५३६, सातवी - ४३,६०२, आठवी - ४४,०९५