सांगली : जिल्ह्यातील १०४ वस्तीशाळा शिक्षकांना नियमित सेवेत घेण्याची मागणी प्राथमिक शिक्षक संघाने केली होती़ त्यांच्या लढ्याला यश आले असून जिल्हा परिषद प्रशासनाने १०४ वस्तीशाळा शिक्षकांच्या प्रस्तावांना आज (सोमवारी) मंजुरी दिली आहे़ तसेच विषय शिक्षक नेमणूक देताना पदवीधारकांनाच सेवाज्येष्ठतेने नेमणूक देण्याचीही मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली़ त्यासही शिक्षण विभागाच्या प्रशासनाने सहमती दिली आहे़महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (संभाजीराव थोरात गट) जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, अविनाश गुरव, जगन्नाथ कोळपे, सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची आणि शिक्षण समिती सभापती व जिल्हा परिषद उपाध्यक्ष बसवराज पाटील यांची भेट घेतली़ तसेच शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली़ यावेळी बसवराज पाटील यांनी शिक्षणाधिकारी पुन्ने, उपशिक्षणाधिकारी डी़ सी़ लोंढे यांना तातडीने वस्तीशाळा शिक्षकांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्याची सूचना दिली होती़ त्यानुसार १०४ वस्तीशाळा शिक्षकांच्या प्रस्तावांना त्यांनी तातडीने मंजुरी दिली आहे़ प्रशासनाच्या या निर्णयामुळे वस्तीशाळा शिक्षकांना अखेर न्याय मिळाला आहे़विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, वरिष्ठ मुख्याध्यापक आणि पात्र पदवीधरांना तातडीने पदोन्नती देण्याची मागणी केली़ विषय शिक्षक नेमणूक देताना पदवीधारकांनाच सेवाज्येष्ठतेने नेमणूक देण्याची शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली़ यावर बसवराज पाटील यांनी, पदवीधारकांनाच विषय शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात येईल, असे आश्वासन दिले़ यावेळी शशिकांत माणगावे, हंबीरराव पवार, मारूती देवकर, दगडू येवले, धनाजी घाडगे, रामचंद्र खोत, प्रभाकर काकडे, संजय काटे, बाजीराव पाटील आदी उपस्थित होते़ (वार्ताहर)
शंभरावर वस्तीशाळा शिक्षक नियमित
By admin | Updated: July 1, 2014 00:39 IST