ढालगावपासून पूर्वेकडील बाजूला दोन किलोमीटरवर खडपाच्या माळावर गवतास बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास अचानक आग लागली. वाळलेले गवत व वारा यामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली. त्या शेताजवळच वैरणीची गंजी होती. तिने जोरात पेट घेतला. माळारानाला लागून असलेली बागायत शेतीही या आगीच्या ज्वाळात होरपळून निघाली. आगीत शिवाजी राजाराम भोसले यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांची पाच हजार ज्वारी व मक्याची वाळलेली वैरण, चिकू बाग, तुतीची शंभरावर झाडे, ठिबक सिंचन साहित्य, पाईपलाईन जळाली आहे. यामध्ये त्यांचे सुमारे सव्वा लाखाचे नुकसान झाले. राजू आण्णा स्वामी यांचे पोल्ट्री साहित्य जळून पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे. पोपट रमेश झुरे व अमोल माणिक झुरे यांची पाईपलाईन, आंब्याची झाडे जळाली आहेत. त्यांचे पंचवीस हजारांचे नुकसान झाले आहे.
अमोल झुरे, प्रवीण झुरे, पोपट झुरे, चंद्रकांत झुरे, अजय झुरे, शिवाजी भोसले व त्यांचे कुटुंबीय संभाजी भोसले, गणपत झुरे, काशिनाथ झुरे यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आगीचे नेमके कारण समजले नाही. अडीच तास प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आली.