सांगली : कोरोनाची तिसरी लाट अधिक भयंकर असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. दीडशे पट रुग्णसंख्या वाढण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्व तयारी ठेवण्याचे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते.
पालकमंत्री म्हणाले, तिसऱ्या लाटेत दीडशे पट रुग्णसंख्या वाढण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. प्रशासनाने ऑक्सिजन साठवण क्षमता व ऑक्सिजन निर्मितीबाबत योग्य नियोजन करावे. दोन हजारहून अधिक ऑक्सिजनवरील रुग्ण झाल्यास परत लॉकडाऊन होईल. लक्षणे दिसताच तपासणी व औषधोपचार सुरु केले पाहिजेत. नियोजनसाठी टास्क फोर्स तयार करावा. प्राथमिक आरोग्य केंद्रांत औषधसाठा सज्ज ठेवावा. गर्दी व संसर्ग टाळण्यासाठी दुकानदारांनी घरपोच डिलिव्हरीसाठी तयारी ठेवावी.
यावेळी पाटील यांनी पूरपश्चात परिस्थितीचा आढावा घेतला. ३८ हजार ४८९ पंचनामे पूर्ण झाले आहेत. पशुधनाचे पंचनामेही पूर्ण झाले आहेत. ३९ हजार ४०० कुटुंबांना धान्यवाटप झाले आहे. तर ३९ हजार ६९५ हेक्टर कृषी क्षेत्राचे पंचनामे अंतिम झाल्याचे ते म्हणाले.
या बैठकीला महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, आयुक्त नितीन कापडनीस, प्रभारी अपर जिल्हाधिकारी मौसमी बर्डे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक, मिरज वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. प्रदीप दीक्षित, कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, आदी उपस्थित होते.