सांगली : भरधाव वेगाने वाहन चालविल्यानंतर आता पोलीस अडवत नाहीत तर केवळ एकच फोटो घेतात. तुम्ही जर या फोटोकडे दुर्लक्ष करून नियमांचे उल्लंघन करतच असाल तर वेळीच सावध होणे गरजेचे आहे. पोलिसांनी आता ‘पावती बुका’ची सुटी करत ‘ई-चलन’ सुरू केले आहे.
पोलिसांच्या या नवीन कारवाईमुळे दंडाची पावती थेट घरात येते, तर दंडाची रकमेचा बोजा वाहनावर चढविला जात असल्याने तुमच्या वाहनावर दंड तर नाही ना याची खातरजमा करुन घेणे आवश्यक बनले आहे. ई-चलनाद्वारे केलेला दंड अनेकजण भरत नसल्याने तो बोजा वाहनावर येतो. पोलिसांकडून दंडाची रक्कम भरण्याबाबत आवाहन करण्यात येत असल्याने वाहनधारकांनी आपल्या वाहनावर दंडाची रक्कम तर नाही ना याची खातरजमा करून घेणे आवश्यक आहे. ई- चलनात आपण केलेल्या नियमभंगाची माहिती असल्याने त्याद्वारे दंड भरल्यास पुढील कारवाईपासून सुटका होणार आहे.
चौकट
कसे फाडले जाते ई-चलन
१) शहरासह जिल्ह्यातील पोलिसांकडे मोबाईलमध्ये याबाबतची सोय आहे. वाहनधारकाने वाहतूक नियम मोडला की, पोलीस त्याच्या वाहन क्रमांकाचा फोटो फक्त काढून घेतात. तासाभरानंतर हा दंड ‘अपडेट’ होतो व दंडाची पावती त्या वाहनक्रमांक नोंदणीवेळी दिलेल्या पत्त्यावर येते.
२) काही ठिकाणी पोलिसांकडे ई-चलन करण्यासाठी छोटे डिव्हाईस देण्यात आले आहे. यात थेट वाहनधारकाचा वाहन क्रमांक, मोबाईल क्रमांक घेऊन दंड केला जातो.
चौकट
मोबाईल अपडेट केला आहे का?
* ई-चलनाव्दारे झालेल्या दंडाचा संदेशही अनेकवेळा वाहनधारकांना येतो. त्यामुळे दुसऱ्या कोणी वाहन नेले असेलतर त्याच्या कारनाम्याची माहिती मिळू शकते.
* यासाठी वाहनधारकांनी आपला मोबाईल क्रमांक अपडेट करणे आवश्यक आहे.
* दंडाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लगेचच नियम मोडणाऱ्या वाहनधारकाला संदेश मिळत असल्याने त्याला तो भरणे अनिवार्य ठरतो.
चौकट
दंडाची थकबाकी वाढली
* पोलीस दलाने अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करताना ई चलन सुरु केले असलेतरी अनेक वाहनधारकांना नोटीस बजावूनही ते तो दंड भरत नसल्याचे चित्र आहे.
* पोलीस मुख्यालयासह वाहतूक शाखेत येऊन हा दंड भरता येऊ शकतो. मात्र, तरीही अजून दंड भरण्यात उत्सुकता दाखवली जात नाही.
* ई चलनाव्दारे केलेला दंड न भरल्याने थकबाकी वाढत आहे.
कोट
ई चलनाची रक्कम भरा
वाहनधारकांनी नियमभंग केल्यास तातडीने त्याच्यावर कारवाई होते. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करुन ई चलन तयार होते. वाहनधारकांनीही विनाविलंब ई चलनावरील दंडाची रक्कम भरावी.
प्रज्ञा देशमुख, सहा. पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा