कडेगाव : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने घाटमाथ्यावरील कडेगाव तालुक्यातील २० व खानापूर तालुक्यातील ३ अशा २३ गावांमधून आगामी गळीत हंगामात गाळपासाठी येणाऱ्या उसाच्या नोंदी अद्याप घेतलेल्या नाहीत. पुन्हा सत्तेच्या खुर्चीवर विराजमान होऊनही सहकार पॅनेलचा कारभार ‘ये रे माझ्या मागल्या’ असाच राहणार की सुधारणा होणार, याबाबत येथील कार्यक्षेत्रात उलटसुलट चर्चा आहे.
मागील निवडणुकीत घाटमाथ्यावरून तिसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या सहकार पॅनेलला आता पहिल्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. त्यामुळे ‘आता तरी घाटमाथ्याला न्याय द्या, दुजाभाव सोडा’ अशी हाक सभासद शेतकरी देत आहेत. कारखान्यात राजकारणविरहित कामकाज करणार, शेती विभागाच्या पाळीपत्रकाप्रमाणेच ऊस तोडीचा कार्यक्रम राबविणार, त्यात कोणताही हस्तक्षेप होणार नाही, असे निवडणुकीत दिलेले आश्वासन कारभारी पाळणार का? याबाबत घाटावरच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये सभासद शेतकऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा आहे.
मागीलवर्षी जून २०२० पासून मार्च २०२१ पर्यंत लावलेला ऊस आगामी गळीत हंगामात गाळपासाठी जाणार आहे. मात्र त्याची नोंद कारखान्याने अद्याप घेतलेली नाही. चालूवर्षी सुरू असलेल्या आडसाली लागणीच्या नोंदी घेण्याची व्यवस्थाही केलेली नाही. कारखान्याची घाटमाथ्यावरील गट कार्यालये नियमित वेळेनुसार उघडलेली दिसत नाहीत. कृष्णाकाठावरील उसाच्या बराेबरीने रिकव्हरी असताना आणि आडसाली लागणी मोठ्या प्रमाणावर असताना ऊसनोंदी घेण्यासाठी टाळाटाळ का? असा सवाल शेतकरी करीत आहेत.
चौकट :
वारस नोंदीसाठी धडपड
घाटमाथ्यावरील मृत सभासदांच्या वारस नोंदीची प्रलंबित प्रकरणे मोठ्या प्रमाणावर आहेत. मृत सभासदांचे वारसदार या नोंदीसाठी वर्षानुवर्षे धडपड करीत आहेत. आता पारदर्शक कारभाराचे आश्वासन देऊन पुन्हा सत्ता मिळवलेले सत्ताधारी मृत सभासदांच्या वारसांना न्याय देऊन त्यांना कारखान्याचे सभासदत्व देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.