कोकरुड : शेडगेवाडी फाटा (ता. शिराळा) येथील अंबिका स्टील सेंटरमधील साडेसतरा लाखांच्या चोरीप्रकरणी फिर्यादी जयंतीलाल रामलाल ओसवाल यालाच रोख रकमेसह अटक केली.
संशयित जयंतीलाल ओसवाल याचे शिराळा-चांदोली रस्त्यावर शेडगेवाडी फाटा या ठिकाणी स्वतःच्या मालकीचे अंबिका स्टील या नावाचे दुकान असून तेथून तो सळी, सिमेंट, फरशी यासह अनेक प्रकारचे साहित्य विक्री अनेक वर्षांपासून करत आहे. तेथे त्याच्या कुटुंबीयासह लहान भाऊ प्रकाश राहात होता. भाऊ प्रकाश यास दुसऱ्या ठिकाणी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे द्यायचे ठरले होते. मात्र, जयंतीलाल यास ते मान्य नसल्याने त्याने मंगळवार, दि.६ रोजी घरी पाच लाखांची चोरी झाली असल्याची तक्रार कोकरुड पोलिसात दिली होती. बुधवारी आणखी बारा लाख सत्तर हजाराची चोरी झाल्याची अशी एकूण १७ लाख ७० हजाराची चोरी झाल्याची माहिती पोलिसांना दिली होती. सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधिक्षक मनीषा दुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासास सुरुवात केली.
प्रथम दोघा संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली होती. मात्र, जयंतीलाल याच्या हालचाली, मोबाईल संपर्क आणि त्याच्याकडे केलेल्या चौकशीमधून त्याचावर संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता भावास पैसे द्यावे लागतील म्हणून स्वतःच साडेसतरा लाख रुपयांची रोख रक्कम कऱ्हाड येथील मित्राकडे ठेवल्याचे सांगितले. त्याप्रमाणे वरील सर्व रक्कम ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे.
जयंतीलाल याने अनेक प्रकारचे गैरव्यवहार केल्या असल्याच्या तक्रारी असून अधिक तपास सुरूच राहील. गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सहायक पोलीस फौजदार शंकर कदम, पोलीस एकनाथ भाट, मोहसीन मुल्ला, विशाल भोसले, शेखर गायकवाड, कॅप्टन गुंडवाडे यांचे सहकार्य लाभले.
तीन दिवसांत गुन्हा उघडकीस
तीन दिवसांत चोरी प्रकरणाचा गुन्हा उघडकीस आणल्याने सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ आणि त्यांच्या पथकाचा जिल्हा पोलीसप्रमुखांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती पिंगळे यांनी दिली.