इस्लामपूर : कामेरी (ता. वाळवा) येथे चोरट्यांनी घराची कडी काढून कपाटातील ७५ हजार रुपयांची रोकड आणि दोन तोळे वजनाची सोन्याची अंगठी असा अंदाजे दीड लाख रुपयांच्या ऐवजाची चोरी केली. ही घटना गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत अनिल बाळासाहेब पाटील (रा. कामेरी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पाटील यांनी हे पैसे आणि सोन्याची अंगठी भाचीच्या लग्नाकरिता ठेवली होती. बुधवारी रात्री ११ च्या सुमारास पाटील कुटुंबीय झोपी गेले. पहाटे चारच्या सुमारास त्यांच्या आई उठल्यानंतर त्यांना पैसे व सोने ठेवलेले कपाट उघडे दिसले. त्यानंतर घरातील सर्व जण उठले. अज्ञात चोरट्यांनी घराची कडी काढून आत प्रवेश करत कपाटातील रोकड आणि सोन्याची अंगठी चोरल्याचे निष्पन्न झाले.