सांगली : शहरातील राम
मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी ३१ हजार रुपयांचे साहित्य चोरून नेल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत महेश मुरलीधर जोशी (वय ४१, रा. मंगलमूर्ती काॅलनी) यांनी सांगली शहर पोलिसांत फिर्याद दिली.
सध्या कोरोनामुळे शहरातील सर्वच मंदिरे बंद आहेत. केवळ पूजाअर्चा करण्याची परवानगी आहे. महेश जोशी हे राम मंदिरात पुजारी म्हणून काम पाहतात. सोमवारी सकाळी मंदिरात आल्यानंतर चोरीचा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपअधीक्षक अजय टिके, निरीक्षक अजय सिंदकर यांनी मंदिराला भेट देऊन पाहणी केली.
सोमवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्याच्या शटरचे कुलूप तोडून प्रवेश केला. मंदिरातील पितळी प्रभावळ, मोठी समई, पितळी दिवे, तांब्या, दोन मोठ्या घंटा, पितळी बाळकृष्ण व गणपतीची मूर्ती, पितळी घंटी, लाकडी चौरंग असा ३१ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.