सांगली : जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून थॅलेसेमियावरील औषधांचा तुटवडा निर्माण आहे. त्यामुळे रुग्णांचा जीव टांगणीला लागला असून, रुग्णांच्या नातेवाइकांना परजिल्ह्यातून ही औषधे मागविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. काही सामाजिक संघटना त्यांना मदत करीत असल्या तरी जिल्ह्यातच ही औषधे तातडीने उपलब्ध होणे गरजेचे आहे.
आनुवंशिक अथवा अन्य कारणांमुळे लहानपणापासून थॅलेसेमिया रोगाचा सामना करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यामध्ये बालरुग्णांचे प्रमाण अधिक आहे. ठराविक कालावधीत ‘ब्लडट्रान्समिशन’, चाचण्या आवश्यक असणाऱ्या या रोगाला नियमितपणे औषधे देणेही गरजेचे आहे. औषधांविना रुग्णाच्या यकृताला सूज येण्याची भीती असते. त्यामुळे थॅलेसेमिया बाधित रुग्णाला डेफ्रिजिट किंवा डेफिरासिरॉक्स किंवा केल्फर या गोळ्या घेणे अनिवार्य असतात, मात्र ही औषधे शासकीय रुग्णालयात उपलब्धच नाहीत. त्यामुळे रुग्णांना सतत रुग्णालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. याशिवाय परजिल्ह्यातून औषधे मागविण्यासाठी कसरत करावी लागते. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत असताना त्यांचा जीवही टांगणीला लागला आहे.
औषधांसाठी चकरा मारण्याची आली वेळ
शासकीय रुग्णालयातून ही औषधे मोफत देण्यात येतात. बाहेर ही औषध फार महागडी असल्याने विकत घेणे सामान्य रुग्णाला किंवा त्यांच्या नातेवाइकांना परडवत नाही. प्रत्येक पंधरा दिवसाला रक्ताची गरज, वैद्यकीय चाचण्या यांचा खर्चही अधिक असतो. त्यामुळे रुग्णांची आर्थिक कोंडीही होती. ही कोंडी काहीअंशी मोफत औषधांच्या माध्यमातून दूर होत असते, मात्र शासकीय रुग्णालयात औषधे उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक सध्या चिंतेत आहेत.
चौकट
सामाजिक संघटनेकडे मदत
कोल्हापूर येथील फाइट अगेन्स्ट थॅलेसेमिया या संघटनेकडे सांगली जिल्ह्यातील रुग्णांच्या नातेवाइकांनी संपर्क साधून कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयातून औषधे मागवून घेतली. अद्यापही ही संघटना मिळेल तिथून औषधे उपलब्ध करून देत आहे.
चौकट
जिल्ह्यातील थॅलेसेमियाचे रुग्ण २५०
लहान मुलांच्या औषधांच्या डोसची किंमत २ ते ३ हजार
मोठ्या डोसची किंमत चार हजार रुपये
कोट
सांगली जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात महिन्याभरापासून औषधेच उपलब्ध नाहीत. येथील रुग्णांना आम्ही कोल्हापुरातून औषधे देत आहोत. सातारा जिल्ह्यातही टंचाई आहे, मात्र त्यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरु केला आहे. सांगली जिल्ह्यात याबाबत उदासीनता दिसून येते.
- धनंजय नामजोशी, अध्यक्ष, फाइट अगेन्स्ट थॅलेसेमिया