इस्लामपूर : आर्थिक अडचण असल्याचे भासवत सख्या बहिणीकडूनच पाच लाख रुपये किमतीचे १३ तोळे सोन्याचे दागिने लाटणाऱ्या भावास येथील न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, या भामट्याने मोलमजुरी करून जगणाऱ्या महिलांसह अनेक कुटुंबांना गंडा घातल्याचे समोर येऊ लागले आहे. त्याच्या या आर्थिक घोटाळ्याची व्याप्ती किमान ५० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
मारुती अरुण जाधव (रा. लोणार गल्ली, इस्लामपूर) असे फसवणूक करणाऱ्या भावाचे नाव आहे. त्याच्या विरुद्ध अनिता संजय देशमाने यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. डिसेंबर २०१८ मध्ये मारुती जाधवने बहीण अनिता यांच्याकडून १३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने दोन महिन्यांच्या परत करण्याच्या बोलीवर घेतले होते. हे दागिने परत न करताच बहिणीलाच जिवे मारण्याची धमकी देऊ लागला. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच देशमाने यांनी पोलिसात फिर्याद दिली.
दरम्यान, मारुती जाधवच्या फसवणुकीच्या कारनाम्याची व्याप्ती मोठी असल्याचे समोर येऊ लागले आहे. स्थानिक पातळीवर बचतगट आणि भिशीच्या माध्यमातून बचत करत पैसे साठविणाऱ्या कष्टकरी महिलांनाही त्याने गंडा घातल्याचे समोर येत आहे. एका माजी सैनिकालाही त्याने ७ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. मारुती जाधवकडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलांनी पोलीस उपअधीक्षक कार्यालयात धाव घेत आपली कैफियत मांडली. मारुती जाधवच्या फसवणूक प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी स्पष्ट केले.
कोट
मारुती जाधवकडून ज्यांची आर्थिक फसवणूक झाली असेल त्यांनी पोलिसांशी पुराव्यासह संपर्क साधावा. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्याखाली गुन्हा नोंद करून फसवणूक झालेल्यांना परतावा देता येईल अशा पद्धतीने मारुती जाधव विरुद्ध कारवाई केली जाईल.
-कृष्णात पिंगळे, पोलीस उपअधीक्षक.