सांगली : गेल्या महिन्यात आलेल्या महापुराचा फटका बसलेल्या सर्व घटकांना दिलासा देण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वीच्या अटीमध्ये शिथिलता देत पुरामुळे स्थलांतरित व्हावे लागलेल्या कुटुंबालाही आता दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले की, पुरामुळे बाधित व स्थलांतरित केलेल्या कुटुंबांना कपड्यांकरिता पाच हजार रुपये व घरगुती भांडी, वस्तूंकरिता पाच हजार रुपये असे एकूण दहा हजार रुपये सानुग्रह अर्थसाहाय्य देण्यात येत होते. यामध्ये ४८ तासांपेक्षा अधिक कालावधीकरिता घर पाण्यात बुडाले असल्याची अट होती. आता ही अट शिथिल करण्यात आली असून, पुरामुळे स्थलांतरित व्हावे लागले अशांनाही दहा हजार रुपये सानुग्रह अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पुरात पूर्ण नष्ट झालेल्या घरासाठी दीड लाख रुपये, ५० टक्के पडझड झालेल्या घरांसाठी ५० हजार, २५ टक्के पडझडसाठी २५ हजार, १५ टक्के पडझडसाठी १५, नष्ट झालेल्या झोपड्यांसाठी १५ हजारांची मदत करण्यात येणार आहे. नोंदणीकृत दुकानदारांना पंचनाम्याच्या आधारे नुकसानीच्या ७५ टक्के अथवा ५० हजार रुपये अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. टपरीधारकांना दहा हजार, तर कुक्कुटपालन शेडच्या नुकसानीसाठी पाच हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे.
चौकट
मृत दुधाळ जनावरांसाठी ४० हजार, ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी ३० हजार, ओढकाम करणाऱ्या लहान जनावरांसाठी २० हजार, मेंढी, बकरीसाठी चार हजार, कुक्कुटपालन प्रतिपक्षी ५० रुपये मदत देण्यात येणार आहे. मत्स बोटी व जाळीच्या नुकसानासाठी दहा हजार, बोटीच्या नुकसानीला २५ हजार, तर फक्त जाळ्यांच्या नुकसानीला पाच हजारांची मदत करण्यात येणार आहे.