सांगली : माधवनगर येथील सागर ज्वेलर्समधून चोरट्यांनी दिवसाढवळ्या १५ तोळ्याचे सोने आणि चांदीच्या दागिन्याची बॅग लंपास केली होती. याप्रकरणी संजयनगर पोलिसांनी दहा जणांची चौकशी केली आहे. संशयित चोरटे लवकरच ताब्यात घेतले जातील, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी दत्ताजी साळुंखे यांचे माधवनगरमधील बुधवार पेठेत ज्वेलर्सचे दुकान आहे. काल सकाळी साडेनऊच्या सुमारास साळुखे हे ज्वेलर्स दुकान उघडले. घरातून १५ तोळ्याच्या सोन्याच्या आणि चांदीच्या दागिन्यांची बॅग त्यांनी आपल्या दुकानांतील काऊंटरच्या आतील बाजूस ठेवली होती. ते दुकानात साफसफाई करत होते. त्यावेळी संशयित दोघे चोरटे दुकानात आले. तुमचे पैसे दुकानाबाहेर पडले आहेत, असे सांगितले. साळुंखे हे पैसे घेण्यासाठी दुकानाबाहेर गेले. तितक्यात एका युवकाने दुकानात काऊंटरवर ठेवलेली बॅग घेतली. दुसरा युवक दुचाकी घेऊन तिथे आले. क्षणात दोघेही पसार झाले. याप्रकरणी दोघांविरोधात संजयनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.