सांगली : जिल्हा परिषदेकडील परजिल्ह्यातून बदलून आलेल्या प्राथमिक शिक्षकांना पूर्वीच्या वेतनवाढी, वेतन आयोग, वेतनश्रेणी यांच्या पडताळणीसाठी आधीच्या जिल्हा परिषदेकडे हेलपाटे मारावे लागणार नाहीत. त्यांची पडताळणी सांगली जिल्हा परिषदेकडे केली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य वित्त व लेखा अधिकारी राहुल कदम यांनी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिले.
गेल्या आठवड्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांबाबत बोलावलेल्या बैठकीमध्ये संघाचे जिल्हा सरचिटणीस अविनाश गुरव यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. शिक्षकांना सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शन प्रस्तावावेळी पाठीमागच्या वेतन पडताळणी अपूर्ण असल्याचे कारण सांगून पूर्वीच्या जिल्हा परिषदेकडून पडताळणी करून आणायला सांगितले जात होते. त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकांना पेन्शन मिळण्यासाठी विलंब होतो.
शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने कदम यांची भेट घेतली असता, त्यांनी ही वेतन पडताळणी सांगली जिल्हा परिषदच करेल, असे सांगितले. त्यामुळे परजिल्ह्यातील शिक्षकांचा परिविक्षाधीन कालावधी मंजुरीबरोबरच हाही प्रश्न सोडवण्यामध्ये शिक्षक संघाला यश आले. यावेळी सप्टेंबर महिन्याच्याअखेरीस भविष्य निर्वाह निधीचे तक्ते देण्यात येतील, सातवा वेतन आयोग पडताळणीकरिता तालुकानिहाय सर्व शिक्षकांची सेवा पुस्तिका जिल्ह्याकडे मागवून पडताळणी केली जाईल, शिक्षकांचा पगार येणाऱ्या एक किंवा दोन महिन्यातील सीएमपी प्रणालीद्वारे जिल्हा स्तरावरून करण्यात येईल, अशी ग्वाहीही कदम यांनी दिली.
यावेळी जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, सरचिटणीस अविनाश गुरव, अरुण पाटील, संजय पाटील, अशोक पाटील, संतोष जगताप, नितीन चव्हाण, शामगोंडा पाटील उपस्थित होते.
⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
[10:34, 03/09/2021] Avinash Gurav: परजिल्ह्यातून बदलून आलेल्या शिक्षकांची वेतन पडताळणी इथेच केली जाणार