सांगली : विनामास्क फिरणाऱ्यांना आणि सुरक्षित अंतराच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३० लोकांवर शनिवारी महापालिकेच्या टास्क फोर्सने कारवाई करत ३,६०० रुपये दंड वसूल केला.
महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार सांगली, मिरज, कुपवाड शहरांमध्ये जोरदार कारवाई सुरू आहे. यासाठी माजी सैनिकांची नेमणूक करून एक टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. यामध्ये लष्करातील निवृत्त जवानांचा समावेश आहे. टास्क फोर्समार्फत कोविड नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. आतापर्यंत सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणारे, सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या व्यक्तीवर या टास्क फोर्सने कारवाई केली आहे. शनिवारी या टास्क फोर्सने महापालिका क्षेत्रात विनामास्क फिरणाऱ्या तसेच सुरक्षित अंतराच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३० व्यक्तींवर कारवाई करत त्यांच्याकडून ३ हजार ६०० रुपये दंड वसूल केला. टास्क फोर्सची ही कारवाई अशीच सुरू राहणार असून नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करावे आणि कोविडची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी प्रशासनाला साथ द्यावी, असे आवाहन आयुक्त कापडणीस यांनी केले आहे.