तासगाव : बँकेच्या पदाधिकारी निवडीत तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्याला संधी मिळाली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची निराशा झाली आहे. आर. आर. पाटील असते, तर संधी मिळाली असती, अशी भावना व्यक्त होत आहे. पद मिळविताना यापुढे दुसऱ्या नेत्यांवरच अवलंबून राहावे लागणार असल्याची खंत व्यक्त होत आहे.जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील समर्थकांना उमेदवारी वाटपात चांगला न्याय मिळाला. दोन्ही तालुक्यातून पाचजणांना संधी मिळाली. त्यातील तासगाव सोसायटी गटातील उमेदवाराला पराभव पत्करावा लागला. तरीही दोन्ही तालुक्यातून चार जणांना संचालक पदाची संधी मिळाली. त्यामध्ये आर. आर. यांचे बंधू सुरेश पाटील आणि जिल्हा बँकेत मागील वेळी दीड दिवस अध्यक्षपदाची संधी मिळालेल्या दिनकर पाटील यांच्या पत्नी कमल पाटील यांचाही समावेश होता. बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचा निर्णय घेताना आर. आर. पाटील आणि जयंत पाटील यांचा निर्णय अंतिम असायचा. मात्र आर. आर. पाटील यांचे निधन झाल्यामुळे जयंत पाटील हेच राष्ट्रवादीचे एकखांबी नेतृत्व बनले आहे. आतापर्यंत तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील कार्यकर्त्याला पदाची इच्छा असल्यास आर. आर. यांच्याकडेच त्यांचा हट्ट असायचा. परिस्थितीनुसार तो हट्ट पुरवलाही जायचा, अशी परिस्थिती होती. मात्र यावेळी हट्ट करण्याची परिस्थिती नसल्याने केवळ इच्छा व्यक्त करण्यापलीकडे दोन्ही तालुक्यातील इच्छुकांच्या हातात काहीच राहिलेले नाही. (वार्ताहर)जिल्हा परिषद असो किंवा जिल्हा बँक असो, दोन्ही तालुक्यात राष्ट्रवादीचे पारडे जड असल्यामुळे, पद हमखास असायचे. मात्र आर. आर. पाटील यांची पोकळी निर्माण झाल्यामुळे पदासाठी परावलंबी राहावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दीड दिवस अध्यक्ष झालेल्या दिनकर पाटील यांना, आबा असते तर पद मिळाले असते, याची खात्री होती. गणपती सगरे यांनीही पदासाठी आग्रह धरला. मात्र जयंत पाटील यांच्या बेरजेच्या राजकारणामध्ये तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यांची वजाबाकीच झाली.
तासगाव-कवठेमहांकाळचा अपेक्षाभंग
By admin | Updated: May 22, 2015 00:11 IST