इस्लामपूर : साखर कारखान्यांकडे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांकडून लाखो रुपये घेऊन परागंदा होणाऱ्या तोडणी मजूर व मुकादमांकडून पैसे वसूल करण्यास प्रशासन व पोलीस खात्याने मदत करावी, अशी मागणी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याकडे निवेदन देत केली आहे.
राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी.आर. पाटील, उपाध्यक्ष विजयराव पाटील, शेती समितीचे अध्यक्ष श्रेणीक कबाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले. या वेळी संचालक विराज शिंदे, माणिक शेळके, कार्यकारी संचालक आर.डी. माहुली, दूध संघाचे माजी उपाध्यक्ष संग्राम फडतरे, संचालक पोपटराव जगताप, आष्ट्याचे रघुनाथ जाधव, नगरसेवक जगन्नाथ बसुगडे, राजू आत्तार, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील व वाहन मालक उपस्थित होते.
ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांनी राजारामबापू कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव-सुरुल व कारंदवाडी युनिटकडे चालू गळीत हंगामासाठी ऊस तोडणी व वाहतुकीचा करार करून कारखान्याच्या हमीपत्रावर बँकेकडून उचल घेतली आहे. या वाहन मालकांनी बीड, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, सांगोला, मंगळवेढा, विजापूर व जत इत्यादी भागातील ऊस तोडणी मजूर, मुकादमांशी करार करून त्यांना ७ लाखांपासून १५ लाखांपर्यंतची रक्कम आगाऊ दिली आहे. मात्र या मुकादमांनी ऊस तोडणी मजूर पुरवठा केलेला नाही. त्यामुळे ऊस वाहतूक वाहन मालकांचा व्यवसाय बुडाला असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. या मजूर, मुकादमांकडे चौकशी करण्यास गेले असता अथवा त्यांना आपल्या भागात आणले असता, अपहरणासारख्या खोट्या पोलीस तक्रारी घातल्या जातात. उलट आपल्या भागातील पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीच्या तक्रारी दाखल करून घेऊन वाहन मालकांना या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत करावी, अशी कैफियत निवेदनात मांडली आहे. वरिष्ठांशी चर्चा करून जे शक्य आहे, ते सहकार्य करू, अशी ग्वाही तहसीलदार सबनीस यांनी वाहन मालकांच्या शिष्टमंडळास दिली.
फोटो ओळी- ११०१२०२१-आयएसएलएम-इस्लामपूर निवेदन न्यूज
इस्लामपूर येथे तहसीलदार रवींद्र सबनीस यांना राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी.आर. पाटील, विजय पाटील यांनी निवेदन दिले. या वेळी श्रेणीक कबाडे, विराज शिंदे, माणिक शेळके, पोपट जगताप, आर.डी. माहुली, प्रशांत पाटील उपस्थित होते.