सांगली : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांकडे मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिलेल्या निधीसंदर्भात स्थायी समितीच्या सभेत जोरदार चर्चा झाली. गेल्यावर्षीप्रमाणे यावेळीदेखील निधी परत जाणार नाही याची खबरदारी घेण्याच्या खातेप्रमुखांना स्पष्ट शब्दांत सूचना देण्यात आल्या.
अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. गतवर्षी समाज कल्याण, महिला बाल कल्याण विभागांचा निधी परत गेला होता. यंदाही ग्रामीण पाणीपुरवठा, शिक्षण, समाज कल्याण, बांधकाम इत्यादी विभागांकडे मोठ्या प्रमाणात निधी शिल्लक आहे, तो परत जाणार नाही याचे नियोजन करण्याचे आदेश कोरे यांनी दिले. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडील सहा लाखांचा शिल्लक निधी शाळा व अंगणवाड्यांतील नळजोडण्यांसाठी वापरण्याच्या सूचना दिल्या.
एखाद्या मतदारसंघात इतर जिल्हामार्ग नसतील तर त्याचा निधी ग्रामीण मार्गांसाठी वापरण्याची मुभा देण्यात आली, तत्पूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी याविषयी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. नियोजन समितीच्या निधीचा तपशील आठवडाभरात सादर करण्याच्या सूचना खातेप्रमुखांना देण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या इमारतींच्या निर्लेखनासाठी कमीतकमी दराची निविदा अंतिम करावी, असे आदेश अध्यक्षांनी दिले.
चौकट
शिवाजी महाराज पुतळ्याचे काम सुरू
जिल्हा परिषदेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार आहे. सुशोभीकरण आणि प्रत्यक्ष पुतळा असे त्याचे दोन टप्पे आहेत. पैकी सुशोभीकरणाची निविदाप्रक्रिया आठवडाभरात पूर्ण केली जाणार आहे. पुतळ्यासाठी शासनाकडे परवानगीचे पत्र पाठविण्याचे आदेश देण्यात आले.
चौकट
आठवडाभरात कार्यवाही, अन्यथा कारवाई
स्थायीसह विविध बैठकांतील निर्णयांवर अधिकारी माना डोलावतात, प्रत्यक्षात त्याची कार्यवाही मात्र विहित मुदतीत होत नसल्याकडे सदस्यांचे लक्ष वेधले. अशा खातेप्रमुखांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा इशारा अध्यक्षांनी दिला.
------