जत : जत येथील शिवानुभव मंडपजवळील जागेच्या वादातून विजय सदाशिव जाधव याने शोभा हणमंत कैकाडी (वय ४५) या महिलेवर तलवारीने हल्ला केला. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना मंगळवारी रात्री घडली.
अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी विजय जाधव व परशुराम हणमंत कैकाडी यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून जागेच्या कारणावरून वाद आहे. या कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होता.
विजय जाधव हा दारू पिऊन त्यांंना वारंवार येऊन धमक्या देत होता. मंगळवारी रात्री विजय जाधव हा दारू पिऊन परशुराम कैकाडी यांच्या लहान भावाच्या मागे तलवार घेऊन पळाला. तलवारीने वार करणार तेवढ्यात मुलाला वाचवण्यासाठी शोभा कैकाडी या मध्ये आल्या.
या झटापटीत शोभा यांच्या पोटावर एक वार लागला आहे. यामध्ये त्या जखमी झाल्या आहेत. पुढील उपचारासाठी सांगली येथे रुग्णालयात दाखल केले आहे.
विजय जाधव याला जत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबतची फिर्याद परशुराम हणमंत कैकाडी याने जत पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कांबळे करीत आहेत.